दसरा मेळावा हा बाळासाहेबांचा विचार, ती परंपरा मुख्यमंत्री कायम ठेवणार-दीपक केसरकर
आम्ही दसरा मेळावा घेणारच आहोत, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा परंपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे. दसरा मेळावा हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे आम्ही दसरा मेळावा घेणारच आहोत, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत. तसंच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे. त्यांनी दसरा मेळावा घेतला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्टेजवर बोलवावं म्हणजे लोकांना कळेल कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलं आहे, असं म्हणत केसरकरानी टोला लगावला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय. त्यावरही केसरकरांनी भाष्य केलं. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही, जे काही होईल ते कायद्याने होणार, असंही ते म्हणाले आहेत.