शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, पण…- दीपक केसरकर
दीपक केसरकर यांचं सूचक विधान...
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासंदर्भात निर्णय केंद्र सरकारने घेईल. महाराष्ट्राच्या जनतेची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे कळवली आहे. झालेलं वक्तव्य मागे घेण्याबाबतच्या बाबतचं विधान यायला हवं होतं. शिवाजी महाराजांचा अपमान ही भूमी सहन करू शकत नाही. पण केंद्र सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेईल, असं राज्याचे शिक्षण मंत्री तसंच कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले. खासदार उदयनराजे भोसलेही आक्रमक भूमिका मांडत आहेत. लवकरच मुंबईच्या आझाद मैदानावर पुढचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने ही प्रतिक्रिया आली आहे.
‘उरलेल्या नेत्यांची वाट पाहातोय’
जे लोक ठाकरेगटात राहिले आहेत त्यांना लवकरच कळेल आपली चूक झाली आहे. शिवसेना संपवायच्या कटकारस्थानाला उद्धव ठाकरे बळी पडले. आम्ही जनतेशी वफादार आहोत, तुम्ही मला काय म्हणता याकडे आम्ही लक्ष देत नाही. मागे राहिलेले लोक लवकरच चूक सुधारतील अशी अपेक्षा आहे आम्ही त्यांची वाट पाहतोय, असं केसरकर म्हणालेत.
पैशाने माणसं विकत घेतली जात असते तर उद्योगपती नेते झाले असते. माणसं प्रेमाने जिंकता येतात. तुम्ही आमदारांना कधी भेटला नाहीत त्यांना घराबाहेर उभं केलं, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.
कर्नाटक सीमावादावरही केसरकर बोललेत. कर्नाटकने अविचाराने एखादा निर्णय घेतला तर तसा निर्णय आपणही घ्यायला पाहिजे असं नाही. त्यांच्या लोकांना आम्ही मुंबईमध्ये बंदी घालू शकतो पण तसे आम्ही करणार नाही, असंही केसरकर म्हणालेत.