संजय राऊत… ‘हे’ शब्द दहशतवाद्यांचे… जामीन कँसलही होऊ शकतो, दीपक केसरकरांचा इशारा काय?
दीपक केसरकर असे म्हटले असतील तर 2024 साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
मुंबईः संजय राऊत यांनी 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिलाय. संजय राऊत वारंवार दहशतवाद्यांसारखी भाषा वापरत आहेत. चुकून कुणी अशा शब्दांमुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची विनंती कोर्टाकडे करू शकते, असा सूचक इशाराही केसरकर यांनी दिला आहे. तर केसरकर यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊत यांनी शिंदे गटाची टोळी असा शब्द वापरला आहे. तसेच या टोळीचं एन्काउंटर करतो, असं वक्तव्यही केलं. त्यावर दीपक केसरकर म्हणाले, आधी रेड्यांचा बळी देतो म्हणाले, आता टोळीचं एनकाउंटर करतो म्हणाले…. एकदा तुरुंगात जाऊन आल्यानंतर पुन्हा जाण्याची काय हौस आहे, कळत नाही..
एनकाऊंटर वगैरे हे दहशतवाद्यांचे शब्द आहेत. कुणी ऐकलं आणि त्यांचा जामीन कँसल करण्यासाठी अर्ज केला तर धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्याबद्दल आदर आहे, म्हणून हा सल्ला देतोय, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित घोटाळ्यांच्या आरोपांखाली संजय राऊत ईडीच्या अटकेत होते. सध्या ते जामीनावर आहेत.
याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणालेत, आम्ही आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी जेलमध्ये. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत. लफंगेही नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय किंवा कायदा नाहीत.
दीपक केसरकर असे म्हटले असतील तर 2024 साली त्यांनीही तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
भाजपावर हल्लाबोल
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपावर हल्लाबोल केला. अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाला आहे.
यावर संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल कुठलाही वाद असू नये या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतर राज्यांना फक्त भूगोल आहे.
राज्यपालांच्या दारात जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपालांनी माफी मागावी असे का भाजप सांगत नाही? ज्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, त्या शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात भाजप आणि सध्याचे मुख्यमंत्री का गप्प आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.