Deepak Kesarkar | शिंदेंविना युतीसाठी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन? दीपक केसरकर म्हणतात, अनिल परब यांचे कॉल रेकॉर्ड तपासा…
आदित्य ठाकरे यांनी काल भिवंडीत बोलताना म्हटलं की उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरी झाली. याला उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, ' उद्धव साहेब आजारी होते, तेव्हा हे बंड झालं असं म्हणणं चुकीचं आहे. उद्धव साहेब बरे झाल्यानंतर शिंदे यांनी भेट घेतली.
मुंबईः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फोन केला होता. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून भाजप शिवसेना युती करण्याचा प्रस्ताव दिला होता, अशा बातम्या सध्या माध्यमांतून बाहेर येत आहेत. हे खरंच झालंय का? पक्षात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माणसाबद्दल उद्धव ठाकरे असं बोलत असतील तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय? असा सवाल एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. या फोनची आणि उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाची सत्य-असत्यता पडताळायची असेल तर अनिल परब (Anil Parab) यांचे फोन कॉल चेक करा. कारण उद्धव ठाकरे स्वतःच्या फोनवरून कधीच बोलत नाहीत. ते अनिल परबांच्या फोनवरून बोलतात, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरु आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंद्वारे मार्गदर्शन केलं जात आहे. मात्र या वेळी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर आरोप, अपमान करत आहेत. अशा प्रकारे नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका, असं वक्तव्यही दीपक केसरकर यांनी केलंय.
ठाकरेंच्या प्रस्तावासाठी फोन चेक करा…
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन गेला होता का, हे आधी तपासण्याचं आवाहन दीपक केसरकरांनी केलं आहे. ते म्हणाले, ‘ उद्धव साहेबांचा फोन फडणवीसांना गेला होता की, शिंदेला बाजूला ठेवा, मी स्वतः तुमच्याबरोबर येतो आपण युती करुया.. म्हणजे तुमच्या पार्टीत नंबर 2 आहेत. जे तुम्हाला वडलासमान मानतात, त्यांच्याबाबतीत तुम्ही असं म्हणत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होईल? शिंदेंकडून आमच्यासारख्यांची प्रत्येक काळात काळजी घेतली, महाराष्ट्रात पूर, भूकंप आला, तिथे पहिली मदत शिंदे साहेबांकडून गेली ही वस्तूस्थिती आहे. त्याच्यासंदर्भात बोलत असाल तर ही धक्कादायक घटना आहे. हे खरंय की खोटं आहे? अनिल परब साहेबांचा फोन चेक करा.. त्यातून हा संवाद खरच झाला असेल तर हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे. शिंदेंना बाजूला ठेवून युती करायची होती तर आज भाजपा का नको? असाही प्रश्न दीपक केसरकरांनी उपस्थिती केलाय.
‘राठोड, दादा भुसे, भूमरेंच्या रक्कात शिवसेना’
एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या शिवसैनिकांना अपमानित केलं जातंय, यावर बोलताना दीपक केसरकरांनी शिवसेनेसाठी या नेत्यांनी किती खस्ता खाल्ल्या, याचे दाखले दिले. ते म्हमाले, ‘ शिवसेना एका नेत्यामुळे उभी झाली. पण नेत्याने हाक दिली तेव्हा महाराष्ट्रातले असंख्य शिवसैनिक उभे राहिले. त्यांनी जीवन समर्पित केलं तेव्हा बलाढ्य शिवसेना उभी राहिली. संजय राठोडांचं लग्न ठरलं होतं तेव्हा ते शिवसेनेसाठी जेलमध्ये होते. त्यांच्या सासऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला जामीन नाही मिळाला तर तुमच्या फोटोबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावू… ७०-८० ट्रक माणसं घेऊन दादासाहेब आले होते. भाजपची जागा सोडा आणि शिवसेनेला द्या म्हणाले. बाळासाहेबांच्या एका शब्दानंतर हजारो शिवसैनिक नाशिकला परतले. भूमरे कितीवेळा जेलमध्ये गेले ते पहा. कधीही मंत्रिपदासाठी हट्ट केला नाही. औरंगाबादचा लढा एकहाती लढत राहिले. शिवसैनिकांनी शिवसेना उभारली असेल तर त्यांच्या निष्पक्ष निष्ठेवर शंका घेणं आम्हाला मनाला लागलेलं आहे.
यात्रा काढा, पण बदनामी नको…
उद्धव ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवरून बोलताना दीपक केसरकर म्हणाले, ‘ तुम्ही कितीही यात्रा काढा, आम्ही कधीही तुमच्याबद्दल अनादराने बोललो का? पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असाल तेव्हा आम्ही बोलू. बाळासाहेब एकवचनी होते. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं ही वस्तुस्थिती आहे. हे पद दिलं नाही. शिंदेसाहेब शांत राहिले. आदित्यजींनी एका मुलाखतीत सांगितलं, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद सोडतो असं सांगितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले होते मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको. ते शिवसेनेला संपवणार आहेत. भाजप-सेनेची युती करा आणि मुख्यमंत्री तुम्हीच रहा.. असं म्हणाले होते..मग एकनाथ शिंदेंची बदनामी का चालवली आहे?
उद्धव ठाकरे बरे झाल्यानंतर बंड झालं..
आदित्य ठाकरे यांनी काल भिवंडीत बोलताना म्हटलं की उद्धव ठाकरे आजारी असताना बंडखोरी झाली. याला उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, ‘ उद्धव साहेब आजारी होते, तेव्हा हे बंड झालं असं म्हणणं चुकीचं आहे. उद्धव साहेब बरे झाल्यानंतर शिंदे यांनी भेट घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, असं म्हणाले. अजूनही हिंदुत्वासोबत युती करूया.. आमच्याकडे याचे पुरावेदेखील आहे. पण ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल सुरु आहे. आज यात्रा सुरु आहेत. पण पूर्वी कार्यकर्त्यांना कुणी भेटलंय का? सिंधुदुर्गात जेवढं पर्यटन आहे, तेवढंच औरंगाबादचंही आहे. पण किती बैठका घेतल्या तिथे? त्यामुळे शिवसेनेच्या यात्रेत सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका, असं आवाहन करत आहे. आपण ज्यांचा मान ठेवतो, ज्यांच्याबद्दल आदराने बोलतो, त्यांच्याविरुद्ध बोलण्याची पाळी कुठल्याही शिवसैनिकावर येऊ नये..