छोटा राजनच्या भावाचं तिकीट कापलं, ‘महायुती’ने उमेदवार बदलला
निकाळजे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात होतं. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधून दीपक निकाळजे निवडणूक लढवणार होता. मात्र या जागेवर रामदास आठवलेंकडून आता नवा उमेदवार देण्यात आला आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे याला दिलेलं तिकीट अखेर कापण्यात (Deepak Nikalaje Candidature Denied) आलं आहे. महायुतीतर्फे रिपाइंकडून जाहीर झालेली उमेदवारी अवघ्या एका दिवसात मागे घेण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने बुधवारी दिलेलं तिकीट काही तासांतच मागे घेतलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंचा पदाधिकारी असलेल्या दीपक निकाळजेला उमेदवारी जाहीर (Deepak Nikalaje Candidature Denied) केली होती.
निकाळजे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात होतं. सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधून दीपक निकाळजे निवडणूक लढवणार होता. मात्र या जागेवर रामदास आठवलेंकडून आता नवा उमेदवार देण्यात आला आहे.
निकाळजेला उमेदवारीची घोषणा होताच नवाब मलिक यांनी ‘मोदींच्या टीम मध्ये दाऊदचा माणूस आहे’, अशी टीका केली होती.
खडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 17 विद्यमान आमदार घरी
फलटणचे स्थानिक पदाधिकारी दिगंबर अगावणे यांना रिपाइंने निकाळजेंच्या जागी उमेदवारी दिली आहे. रिपाइं नेते अविनाश महातेकरांनी ही उमेदवारी जाहीर केली.
अंडरवर्ल्ड डॉनच्या भावाला तिकीट दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर दबावातून पक्षाने उमेदवार बदलल्याची चर्चा आहे. दीपक निकाळजेने गेल्या वेळी चेंबुरमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
महायुतीमध्ये रिपाइंच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. निकाळजेसाठी रिपाइंला चेंबुरची जागा हवी होती, मात्र ती न मिळाल्यामुळे त्याला फलटणमधून उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय माळशिरस (सोलापूर), भंडारा, नायगाव (नांदेड), पाथरी (परभणी) आणि मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई) या जागा मिळाल्या आहेत.
‘रिपाइं’चे जाहीर झालेले उमेदवार
मानखुर्द शिवाजीनगर : गौतम सोनावणे फलटण : दिगंबर आगाव पाथरी : मोहन फड नायगाव : राजेश पवार