सातारा : “ज्या माणसाने स्वत:हाच्या दोन बँका विकल्या, पाच संस्था विकल्या अशा व्यक्तीची कोणतीही मदत बँकेला होणार नाही. राष्ट्रवादीची पूर्ण ताकत जिल्ह्यात आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी कोणतही वक्तव्य करताना थोडं भान ठेवायला हवं, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार (Deepak Pawar) यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना घरचा आहेर दिला. (Deepak pawar criticises Shashikant Shinde for offering ncp joining to Shivendra Raje Bhosale)
जिल्हा बँकेची निवडणूक जवळ आल्यामुळे येथील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून शक्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत’ आहोत, असे म्हणत सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी दिलजमाई करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी वरील वक्तव्य केले.
“जिल्हा बँकेची निवडणूक आली आहे. काहींना वाटतंय की शिवेंद्रराजेंना पॅनेलमध्ये घ्यायला हवं. याबाबत माझं वैयक्तिक मत आहे की ज्या माणसाने स्वत:हाच्या दोन बँका विकल्या, पाच संस्था विकल्या अशा व्यक्तीची कोणतीही मदत बँकेच्या निवडणुकीत होणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची पूर्ण ताकद आहे. राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीने बँकेची निवडणूक लढवावी. शशिकांत शिंदे यांनी फिरताना कोणतही वक्तव्य करताना थोडं भान ठेवायला हवं,” असे दीपक पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी बोलताना, शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले, तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील. आम्ही त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढू, असे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीतूनच विरोध होतोय. दीपक पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. “शशिकांत शिंदे शिवेंद्रराजेंना पक्षात येण्याचं निमंत्रण देतायत. नगरपालिकेत नेतृत्व करा असे सांगतायत. कृपया असली वक्तव्यं थांबवावीत. तुमच्या या विधानामुळे जावळी मतदारसंघातील तुम्हाला मत दिलेल्या 76 हजार मतदारांमध्ये संभ्रम वाढतॊय. तुम्ही माझे सहकारी आहात. कोणत्याही वल्गना करुन राजकारणाचे अवलोकन करु नका. आपल्या पक्षाचे काम बघा, असा सल्ला पवार यांनी शशिकांत शिंदे यांना दिला
इतर बातम्या :
(Deepak pawar criticises Shashikant Shinde for offering ncp joining to Shivendra Raje Bhosale)