नवी दिल्ली : भारतातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत असं काही घडलं, ज्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना माफी मागावी लागली. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी बोलण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्यांनी त्यांचं भाषण लाईव्ह दाखवलं. (Delhi CM Arvind Kejriwal apologies to PM Narendra Modi during Chief Minister meeting )
यावर पंतप्रधान मोदींनी आक्षेप घेतला. मोदी म्हणाले, “एखाद्या मुख्यमंत्र्याने अंतर्गत बैठकीचं लाईव्ह स्ट्रीम करणं हे आपली परंपरा, आपले प्रोटोकॉल यांच्याविरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला त्याचं पालन करावं लागेल”
पंतप्रधान मोदींच्या या टिपणीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितली. केजरीवाल म्हणाले, “ठिक आहे सर, यापुढे काळजी घेऊ. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी काही कठोर बोललो असेल, माझ्या आचरणात काही अयोग्य घडलं असेल, तर त्यासाठी मी माफी मागतो”
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या संबोधनात, कोरोना नियंत्रणाच्या नॅशनल प्लॅनवर भाष्य केलं. याशिवाय ऑक्सिजन तुटवडा आणि अडवले जाणारे टँकर्स यावर आपलं मत मांडलं आणि मोदींकडून दिलास्याची अपेक्षा केली.
दरम्यान, याबाबत दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं. केंद्राकडून लाईव्ह स्ट्रीमबाबत कोणतेही निर्देश नव्हते, असं CMO ने म्हटलं. मात्र यामुळे जर असुविधा झाली असेल तर आम्ही खेद व्यक्त करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंचं मोदींना आश्वासन
दरम्यान या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी कोरोनाविरोधातील ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरु व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन आणि टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
(Delhi CM Arvind Kejriwal apologies to PM Narendra Modi during Chief Minister meeting )