निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचा विरोध! हायकोर्टातून महत्त्वाची अपडेट, सुनावणी कधी?
धनुष्य बाण चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयावरुन निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेची हायकोर्टात धाव
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्ह (Dhanush Baan) याबाबत घेतलेल्या निर्णयाला ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर आजच तातडीची सुनावणी होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण अखेर याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलीय.
दिल्ली हायकोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे आज तातडीची सुनावणी घेतली जाणार नाही, हे स्पष्ट झालंय. शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय स्थगित करावा, या प्रमुख मागणीसाठी ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय.
Video : नेमकं शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेत काय?
शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी याबाबत सविस्तर भूमिकाही मांडली होती. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घाईघाईने घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या दोन्हीबाबत महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आज घेण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी प्रत्येकी तीन-तीन पर्यायही शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाकडून देण्यात आलेत.
या पर्यायांवर निर्णय येण्याआधी ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्थगित केला जावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. आता उद्या दिल्ली हायकोर्टात या याचिकेवर नेमका काय युक्तिवाद केला जातो आणि त्यानंतर नेमका निर्णय काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.