वर्षभरात दिल्लीने गमावले तीन माजी मुख्यमंत्री, दोघींचं काही दिवसांच्याच अंतराने निधन
दिल्लीने वर्षभराच्या कालावधीतच तीन माजी मुख्यमंत्री गमावले. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि मदन लाल खुराना या तिघांचं गेल्या वर्षभरात निधन झालं
मुंबई : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजपसह राष्ट्रीय राजकारणाची अपरिमीत हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्याचसोबत कोणे एके दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भूषवलेले तीन दिग्गज राजकारणी एक वर्षाच्या कालावधीत निवर्तल्याचा दुर्दैवी योगायोग पाहायला मिळाला.
सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि मदन लाला खुराणा या दिल्लीच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला. मदन लाला खुराणा हे 1993 ते 1996 या कालावधीत दिल्लीचे मुख्यमंत्री होते. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
सात वेळा खासदार राहिलेल्या सुषमा स्वराज यांनी 13 ऑक्टोबर 1998 ते 3 डिसेंबर 1998 या अल्प काळासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. त्यांना दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.
सुषमा स्वराज यांच्यानंतर काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. शीला दीक्षित यांनी सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्चा सांभाळली. 1998 ते 2013 अशी पंधरा वर्ष त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. 20 जुलै 2019 रोजी शीला दीक्षित यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दोनच महिला आतापर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. योगायोग म्हणजे दोघींचंही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. केवळ काही आठवड्याच्या अंतराने दोघींनी जगाचा निरोप घेतला.
पहिल्या वहिल्या
सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तर होत्याच, शिवाय सुषमा या हरियाणाच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या सर्वात युवा मंत्री होत्या. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी पेलली होती.
इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्रालय सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं प्रवक्तेपद सांभाळणाऱ्याही त्या पहिल्याच महिला होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी यंदा लोकसभा निवडणूक (2019) न लढवण्याचा निर्णय घेतला होता.
सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.
सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.
सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019) यांची संपूर्ण कारकीर्द
2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री
मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री
2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या
जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री
जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री
ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री
मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)
मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)
संबंधित बातम्या :
रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का
सुषमाजी, तुम्हाला देश कधीही विसरणार नाही : नरेंद्र मोदी
विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द
Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!
57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!
Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!