नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकिकडे शेतकरी आंदोलन सुरु आहेत, तर दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणात हाय व्होल्टेज ड्रामा होताना दिसतोय. आपच्या आमदार आतिशी आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासह आम आदमी पार्टीचे (AAP) अनेक नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरासमोर आंदोलनाला जात असताना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर दिल्ली महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. जो पर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गृहमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करु, अशी भूमिका आमदार आतिशी यांनी घेतली होती (Delhi police take AAP leader in custody while protesting at home minister residence).
विशेष म्हणजे भाजपचे दिल्ली महानगरपालिकेचे (MCD) महापौरांनी याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आपच्या नेत्यांनी देखील दिल्ली पोलिसांकडे अमित शाह यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत शाह यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आप नेते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करता येतं, तर गृहमंत्र्यांच्या घराबाहेर का नाही? असाही प्रश्न आपने उपस्थित केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत सर्वांना ताब्यात घेतलं.
Delhi: Police detain AAP leader Atishi Marlena from near residence of Delhi Lieutenant Governor Anil Baijal.
She was to hold a demonstration outside the residence of Lt Governor against alleged misappropriation of funds done by North Delhi Municipal Corporation. pic.twitter.com/YBKnBDIJvv
— ANI (@ANI) December 13, 2020
‘दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर भाजपला आंदोलनाला परवानगी, मग गृहमंत्र्यांच्या घराबाहेर का नाही?’
दिल्ली पोलिसांनी आपच्या आंदोलनाला परवानगी नाकारताना केंद्रीय गृह मंत्र्यांच्या निवासाबाहेर सभा घेण्यास अथवा आंदोलन करण्यास परवानगी नसल्याचं म्हटलं होतं. यावर आपच्या नेत्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनाला परवानगी दिली जाते, मग गृहमंत्र्यांच्या घराबाहेर का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, आज (13 डिसेंबर) सकाळी आपचे नेते राघव चड्ढा यांच्यासह 9 जणांना आंदोलनासाटी गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या घराकडे जाताना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या सर्वांना राजेंद्रनगर पोलीस स्टेशनला नेले.
आमदार आतिशी यांनी म्हटलं होतं, “दिल्ली महानगरपालिकेच्या अडीच हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करावी. जोपर्यंत गृहमंत्री या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत आपचे नेते अमित शाह यांच्या घराबाहेर बसून ठिय्या आंदोलन करतील.”
राघव चड्ढा आणि आमदार आतिशी यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या घराबाहेर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यासाठी दिल्ली पोलीस उपायुक्तांना पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी उत्तरी दिल्ली महानगरपालिकेच्या फंडातील भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीसाठी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. या निवेदनात आप आमदारांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरासमोरील भाजप नेत्यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला होता. तसेच जशी भाजपला मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली तशी आपलाही गृहमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आप नेत्यांनी केली होती.
हेही वाचा :
देशातील नागरिक कोरोनानं त्रस्त, प्रत्येकाला मोफत लस मिळावी: अरविंद केजरीवाल
दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा
Delhi police take AAP leader in custody while protesting at home minister residence