‘कुठंतरी पाणी मुरतंय त्यामुळेच रवी राणांनी आरोप केले’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने केली चौकशीची मागणी
आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे.
औरंगाबाद : आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे. कोणाला किती खोके पोहोचले यावरून आता आमदारांमध्ये भाडंण सुरू झाल्याचा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील या वादावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
दानवेंचा टोला
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणा यांनी आरोप केले असतील असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांनी या सर्व प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. आता दानवे यांच्या टीकेला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
दरम्यान रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यस्थी करणार आहेत. आज रवी राणा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे बच्चू कडू यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी बोलावले आहे. दोन्ही आमदारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना देखील वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.