फडणवीसांच्या नावे आणखी एक रेकॉर्ड! हे असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडतंय..
आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही पूजेचा मान स्वीकारणारे महाराष्ट्रातील ते पहिले राजकारणी आहेत.
प्रदीप कापसे, मुंबईः समस्त विठ्ठल भक्तांना आस लागलीय ती कार्तिकी एकादशीची (Kartiki Ekadashi). येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या दिवशी पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल पूजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मिळाला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे राजकीय नेते ठरलेत, ज्यांना आषाढी आणि कार्तिकी एकादशी अशा दोन्ही पूजेचा मान मिळालाय. महाराष्ट्रात सत्तांतराच्या घडामोडी सुरु असतानाच देवेंद्र फडणवीसांचे भले मोठे बॅनर्स काही ठिकाणी झळकले होते. आषाढी एकादशीचे दिवस होते ते. विठ्ठलाच्या पूजेला यंदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येऊ दे… असे भले मोठे होर्डिंग्स लागले होते. पण अखेर प्रचंड नाट्यमय घडामोडी झाल्या अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार, आषाढीला विठ्ठल पूजेचा मान मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला. पण आता कार्तिकी एकादशीला मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर देवस्थान समितीचं कार्तिकी एकादशीचं निमंत्रण मिळालं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी पौर्णिमेला विठ्ठलाची पूजा होणार हे निश्चित आहे.
येत्या 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली.
फडणवीस यांना विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच पंढरपूर देवस्थान समितीतर्फे विठ्ठलपूजेचं निमंत्रण दिलं. फडणवीसांनीदेखील हे आमंत्रण स्विकारलंय.
फडणवीस पहिले राजकारणी असे…
आषाढी एकादशीला मुख्यमंत्री तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री हे पंढरपूर येथील विठ्ठलाची पूजा करतात, अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र मुख्यमंत्री पदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या काळात आषाढी एकादशीचा मान स्वीकारला होता. आता उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी एकादशीला विठ्ठल पूजेचा मानही ते स्वीकारत आहेत. त्यामुळे आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान स्वीकारणारे महाराष्ट्रातील ते पहिले राजकारणी आहेत, असं म्हटलं जातंय.
महाराष्ट्रातील वारकरी परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी एकादशीला खूप महत्त्व आहे. राज्यभरातून असंख्य भाविक यावेळी पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येतात. यंदा कार्तिकी एकादशीलाही मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.