अजित पवारांकडून बारामती दौरा रद्द, तातडीने मुंबईत दाखल; कारण…
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा करण्यात व्यस्त आहे. मात्र अजित पवारांना बारामती दौरा रद्द करावा लागला आहे. यामागचे कारणही समोर आले आहे.
Ajit Pawar Baramati Tour Cancelled : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच काही ठिकाणी पक्षातील वरिष्ठ नेते हे महाराष्ट्राचे दौरे करताना, यात्रा करताना पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा करण्यात व्यस्त आहे. मात्र अजित पवारांना बारामती दौरा रद्द करावा लागला आहे. यामागचे कारणही समोर आले आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या 8 ऑगस्टपासून राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु करण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कंबर कसली आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ, बारामती, पुणे अशा सर्वच विधानसभा मतदारसंघांत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधतील, असे या जनसन्मान यात्रेचे स्वरुप आहे.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे बारामतीत आयोजित करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार बारामतीत आहे. आजही अजित पवारांचा बारामती दौरा निश्चित झाला होता. मात्र अचानक अजित पवार हे बारामती सोडून मुंबईत परतले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार हे बारामती दौरा सोडून मुंबईत दाखल झाले आहेत. अजित पवार हे काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह हे लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांची आज एकत्र बैठक होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे नियोजित असलेला बारामती दौरा सोडून मुंबईत दाखल झाले आहे. अजित पवारांचा बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे.
अमित शाहांचा दौरा कसा?
आज सोमवारी सकाळी १०.४५ वाजता अमित शाहा हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जातील. यानंतर ११.१५ च्या सुमारास अमित शाहा हे एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर अमित शाह हे दुपारी १२.१० मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. तसेच १२.५० मिनिटांनी अमित शाह हे आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील, असे अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे.