…म्हणून आज तुम्हाला घरी बसावं लागलं, अजित पवारांचा मुनगंटीवारांना टोला
सुधीर मुनगंटीवार हे मंत्री असताना म्हणाले होते की, आबा म्हणजेच आर. आर. पाटील हयात नाहीत म्हणून आमचे (भाजप) सरकार आले आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं
सांगली : “आज आबा जरी नसले, तरी आमच्यासोबत आबांची पुण्याई आणि जिवाभावाची माणसं आहेत. त्यामुळे तुम्हाला (भाजप नेत्यांना) आज घरी बसावं लागलं आहे”, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे (Ajit Pawar Criticise Sudhir Mungantiwar). सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रीपदी असताना केलेल्या वक्तव्याला उपमुख्यमंत्र्यांनी आता उत्तर दिलं (Ajit Pawar Criticise Sudhir Mungantiwar).
“सुधीर मुंगनटीवार हे मंत्री असताना म्हणाले होते की, आबा हयात नाहीत म्हणून आमचे (भाजप) सरकार आले. मात्र, मी मुनगंटीवार यांना सांगतो, आज आबा जरी नसले, तरी आमच्यासोबत आबांची पुण्याई आणि जिवाभावाची माणसं आहेत. त्यामुळे तुम्हाला (भाजप नेत्यांना) आज घरी बसावं लागलं आहे. ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला येत नसतं. याचं भान मुनगंटीवार यांनी ठेवावं. जोपर्यंत बहुमत आमच्यासोबत आहे. तोपर्यंत आमच्या सरकारला धोका नाही, हे भाजप नेत्यांनी चांगल्याप्रकारे समजून घ्यावे”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
आर. आर. पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिधीनिमित्त (16 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगलीच्या तासगावात पोहोचले. इथे आबांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला.
“जोपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे. तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका असणार नाही. यामुळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देणे गरजेचे नाही”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर घणाघात केला.
एका वर्षाच्या आत आबांच्या स्मृतीस्थळाचं काम पूर्ण करु : अजित पवार
“आबा यांच्या पुढील स्मृतीदिनाच्या आत म्हणजेच एक वर्षाच्या आत आर. आर. पाटलांचं अंजनी गावातील स्मृतीस्थळाचं काम पूर्ण केले जाईल. यासाठी आवश्यक असलेल्या 8 कोटी 7 लाख रुपयांचा निधी लवकर मंजूर केला जाईल, मात्र स्थानिक नेत्यांनी त्या निधीचा योग्य वापर करावा”, असंही अजित पवारांनी सांगितलं.