नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आलीय. भाजपच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना एक निवेदन पाठवलं आहे. भाजपच्या या ठरावावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना खोचक टोलाही लगावला आहे. ते नाशिकमधील खरिप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर बोलत होते. (Ajit Pawar’s criticism of BJP’s Resolution on CBI probe)
ज्या आरोपीनं पोलीस खात्यात असताना वातावरण खराब केलं. त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. चंद्रकांत पाटील यांच्याकडे ज्यावेळी महसूलमंत्रीपद होतं, तेव्हा तिथले आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चंद्रकांतदादांबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं होतं. उद्या एखादा आरोपी अजून कुणाचं नाव घेईल मग कसं चालेल? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केलाय. चंद्रकांत पाटील यांना काही सुचत नाही. कुठल्या पक्षाच्या अधिवेशनात असा ठराव झाल्याचं पाहिलं नाही. एखाद्या आरोपीवर किती विश्वास ठेवायचा हे जनतेनं ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिलीय.
दगडफेकीच्या घटनेनंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केलीय. याबाबत विचारलं असता कायदा हातात घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये खरिप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे, असं ठरावात म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.
संबंधित बातम्या :
चुकीला माफी नाही, पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर
Ajit Pawar’s criticism of BJP’s Resolution on CBI probe