असा विरोधीपक्ष पाहिलाच नाही, अब्दुल सत्तारांची पाठराखण करताना फडणवीस काय म्हणाले?
विरोधी पक्षांनी कितीही बॉम्ब बॉम्ब म्हणले तरीही त्यात फार तथ्य नाही, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले.
नागपूरः शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मविआ नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींना या गैरव्यवहारातून नोकरी लावल्याचे म्हटले जात आहे. आज हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सत्तार यांची पाठराखण केली. तर विरोधी पक्षावर निशाणाही साधला. स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप उकरून काढणारा असा पहिलाच विरोधी पक्ष पाहिल्याचं फडणवीस म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप करणारा असा विरोधीपक्ष मी आजवर कधी पाहिला नाही, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
राज्यात टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
फडणवीस म्हणाले, राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा मविआ सरकारच्या काळात झाला. यात सनदी अधिकाऱ्यांपासून अनेक लोक घोटाळ्यात लिप्त होते.. मंत्रालयातले अधिकारीही या प्रकरणी अटक झाले. अब्दुल सत्तारांच्या कोणत्याही मुलीला टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही…
कमिशनरने खुलासा करून त्याचवेळी त्या अपात्र केल्या होत्या. पण सत्तार यांच्यावरील आरोप खोटे आहेत, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं. विरोधी पक्षांनी कितीही बॉम्ब बॉम्ब म्हणले तरीही त्यात फार तथ्य नाही, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीईटी परीक्षेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांचा फायदा घेत स्वतःच्या मुलींनाही नोकरी लावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गायरान जमीन कवडीमोल भावात विकल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. सभागृहात आज या प्रश्नावर चर्चा झाली.
तर गायरान जमीनीबाबतच्या आरोपांनाही अब्दुल सत्तार यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत उत्तर दिलं.
उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांनुसारत जमिनींचं वाटप केल्याचं स्पष्टीकण सत्तार यांनी दिलं. यात कोर्ट जो निर्णय देईल, तो मला मान्य आहे. पण विरोधकांच्या आरोपांना मी जुमानत नाही, असं सत्तार म्हणाले.