दरम्यान, नारायण राणे हे भाजपचेच आहेत. मात्र त्यांचा पक्ष आमच्यासोबत विलीन करायचा की नाही, एवढाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र अंतिम निर्णय शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतरच होईल, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
अनिल परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन फडणवीसांचा सवाल
शिवसेना-भाजप युतीकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील असा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केल्यानंतर ते शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला.
नांदेड : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेना आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या दाव्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अनिल परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल फडणवीसांनी विचारला.
महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री नांदेडमध्ये आहेत. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली. विधानसभेत युती राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत घोषणा करणारे अनिल परब हे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले अनिल परब?
आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचं नेतृत्व करावं, अशी मागणी वरळी मतदारसंघातील गटप्रमुखांनी केली होती. या मागणीवर अनिल परब यांनी शिक्कामोर्तब तर केलंच, पण इथला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असंही जाहीर केलं. आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार, असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला.
शरद पवार साहेबांनी काळाची पावले ओळखली पाहिजे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याची टीका करणाऱ्या विरोधकांनी लक्षात घ्या, आता वंचित बहुजन आघाडी ए टीम होत असून काँग्रेस-राष्ट्रवादी ही बी टीम झाली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितचा विरोधीपक्ष नेता पाहायला मिळेल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं.