‘शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे, अशी घणाघाती टीका केलीय. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते
नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Ashirvad yatra) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Memorial) यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करणाऱ्या शिवसैनिकांची कृती म्हणजे एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे, अशी घणाघाती टीका केली.
शिवसैनिकांची कृती म्हणजे बुरसटलेली तालिबानी मानसिकता
ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत मांडीला मांडी लावून बसलेत
काल आम्ही सवाल विचारला की, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगतात हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले.
राणेंचं शिवसेनेला तोडीत तोड प्रत्युत्तर
राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृती स्थळ दलदलीत आहे. आधी ते पाहा. मग शुद्धीकरण करा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी चढवला.
तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी!
राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
(Devendra fadanvis Criticizrd Shivsainik Over Purification of Balasaheb Thackeray Memorial)
हे ही वाचा :
बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल