अमित शाहांच्या भेटीनंतर सत्ता समीकरणाबाबत फडणवीस म्हणतात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली.
नवी दिल्ली : सत्ता समीकरणाबाबत मी किंवा भाजपमधून कोणीही काहीही बोलणार नाही. कोण काय बोलतं, यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात भाजपचंच सरकार येणार. लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis on Government formation) यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची राजधानी दिल्लीमध्ये भेट झाली. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ फडणवीस आणि शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. राज्यातील दुष्काळाची माहिती यावेळी फडणवीसांनी शाहांना दिली. अमित शाहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis: I don’t want to comment on anything anyone is saying on new Govt formation. All I want to say is that the new Govt will be formed soon, I am confident. pic.twitter.com/t7EWR9IsMf
— ANI (@ANI) November 4, 2019
राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी शाहांची भेट घेतली. मंत्रिमंडळाचं खातेवाटप, शिवसेनेचा 50-50 फॉर्म्युला आणि उपमुख्यमंत्रिपद यासारख्या अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फडणवीस दिल्ली दरबारी, अमित शाहांशी अर्धा तास चर्चा
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बारा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संभाव्य शपथविधीवरही टांगती तलवार आहे. शपथविधी सहा तारखेला होणार असल्याची चर्चा असतानाच आता हा मुहूर्तही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, दिल्लीतच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट होत आहे. तसंच सत्तास्थापनेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा शब्द शिवसेनेला भाजपने कधीच दिला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरु असलेली बोलणी फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.
Devendra Fadanvis on Government formation