सत्ता असताना सुप्रिया ताई स्वतःशी संवाद साधायच्या, मुख्यमंत्र्यांचा टोला
सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या, त्यावेळीच जनतेशी संवाद केला असता तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंवर शरसंधान साधलं.
बीड : विरोधी पक्षांच्या यात्रांना फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे त्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बीडमध्ये महाजनादेश यात्रा सुरु आहे, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विरोधी पक्षांच्या यात्रांना फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे त्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या, त्यावेळीच जनतेशी संवाद केला असता तर ही वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंवरही शरसंधान साधलं. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये वाक्-युद्ध रंगलं आहे.
ज्यांनी लोकसभेत भाजपला विरोध केला, त्यांना बीडच्या जनतेने जागा दाखवली. पुढच्या टप्प्यात काँग्रेसचे काही आमदार आमच्या यात्रेचं स्वागत करणार आहेत. ते स्वागत आम्ही स्वीकारणार आहोत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी 133 कोटी रुपयांचा निधी आपण दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दुष्काळाच्या उपाययोजना आम्ही करत आहोत. मराठवाडा वॉटर ग्रीड ही एक महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे दुष्काळावर मात करता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीड जिल्हा वॉटर ग्रीडलाही आपण मान्यता दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
कोकणात वाहून जाणारं 167 टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यात सोडून मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करणार आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेतून काम झालं. यावर्षी जी काही पिकं दिसत आहेत ती या योजनेमुळेच, असंही फडणवीसांनी सांगितलं.