भावी मुख्यमंत्री अजित पवार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, येऊ शकतात!!
पहाटेच्या शपथविधीतील गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया अधिक चर्चेत आहे.
पुणे : राज्यात एकिकडे सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) हे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले होते. तर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकत आहे. चर्चा तर यापुढील घडामोडीची आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनीही चक्क सकारात्मक प्रतिक्रिया दिली. अर्थात फडणवीस यांनी यावर खोचक टिप्पणी केली. भावी म्हटलंय ना.. कधीतरी त्यांचं राज्य येईल.. येऊ शकतं कधीतरी ते येऊ शकतं, अशी चाणाक्ष प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. पहाटेच्या शपथविधीतील गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया अधिक चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बॅनरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणाऱ्या बॅनरबाजीची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे भावी मुख्यमंत्री कोण, यावरून हे ठिकठिकाणी चर्चा होणारे बॅनर्स झळकत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मलबार हिल भागात पोस्टर्स लागले होते. त्यावर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता.
तर आता आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर अजित पवारांचे पोस्टर्स झळकले आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार असा उल्लेख त्यावर आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा असा मजकूर त्यावर लिहिलेला आहे.
राष्ट्रवादीत तीन नावांवर चर्चा…
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण होऊ शकतं, यावरून चर्चा सुरु आहे. यात अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या तीन नावांची चर्चा आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा पुढचा मुख्यमंत्री महिला असू शकतो, असं वक्तव्य केल्यानंतर सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत होते. त्यानंतर आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भावी मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बॅनरवर भावी म्हटलंय ना.. कधी तरी जेव्हा त्यांचं राज्य येईल.. येऊ शकतं कधीतरी येऊ शकतं. येईल तेव्हा ठरवतील कोण मुख्यमंत्री हे… त्याची लढाई आतापासूनच का ? असा प्रतिसवाल फडणवीस यांनी केलाय.