Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी? उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता

| Updated on: Jun 29, 2022 | 10:48 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा 1 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील असंही सांगण्यात येत आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी? उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंडाळी, त्यांना मिळालेली तब्बल 50 पेक्षा अधिक आमदारांची साथ, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला विरोधातील निकाल, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांचा 1 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील सत्तेचं वाटप कसं असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाहीय. माझी इच्छा होती नव्हती तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ठाकरे कुटुंब माहीत आहे. आम्ही हिंदूंसाठी काम करतो. मी सगळ्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. तुम्ही प्रेम दिलं आशीर्वाद दिला, मी घाबरणारा नाही. उद्या कारण नसताना शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचं धनी व्हायचं नाही’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजप आणि शिंदे गटाचं सत्तेचं वाटप कसं असेल?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार भाजपला पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी मदत करतील. मात्र, त्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सत्तेचं वाटप कसं होणार? शिंदे गटाला किती कॅबिनेट, किती राज्यमंत्री, किती महामंडळं दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला भाजपकडून 13 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदाचा समावेश असेल.

शिंदे गटातील कुणाकुणाला मंत्रीपद?

  1. एकनाथ शिंदे
  2. दादा भुसे
  3. दीपक केसरकर
  4. गुलाबराव पाटील
  5. संदीपान भुमरे
  6. उदय सामंत
  7. शंभुराज देसाई
  8. अब्दुल सत्तार
  9. राजेंद्र पाटील यड्रावकर
  10. बच्चू कडू
  11. प्रकाश आबिटकर
  12. संजय रायमुलकर
  13. संजय शिरसाट