Devendra Fadnavis : मुहूर्त ठरला… देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आज संध्याकाळीच शपथ घेणार, राजभवनावर रंगणार शपथविधी सोहळा
आज संध्याकाळीच 7 वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय. राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार स्थापन होईल हे निश्चित आहे. इतकंच नाही तर आज संध्याकाळीच 7 वाजता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय. राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे दाखल झाले असून देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.
एकनाथ शिंदे समर्थक आमदार शपथविधीली उपस्थित राहणार?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 30 तर अपक्ष मिळून 50 पेक्षा आमदार गेल्या 10 दिवसांपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. आज फडणवीस आणि शिंदे यांचा शपथविधी होणार आहे. अशावेळी शिंदे यांचे समर्थक आमदार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला जातोय. हे शिंदे समर्थक आमदार सध्या गोव्यात आहेत.
View this post on Instagram
शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांसाठ व्हिप जारी
एकनाथ शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांनाही व्हिप जारी केलाय. या आमदारांनी आपलं ऐकावं असं गोगावले यांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात वाद अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झालीय.
एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा
गोव्याहून मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. राज्य सरकारतर्फेही येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आल्यामुळे शिंदे समर्थकांचीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. कार्यकर्त्यांनी मोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. त्यांना भेटण्यासाठी समर्थक पुढे जात होते. मात्र पोलिसांची एक मोठी फौज जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे तैनात करण्यात आली होती. शिंदे यांच्या गाडीच्या मागे पुढेही अनेक गाड्यांचा ताफा देण्यात आला. या गाड्यांची संख्यात जवळपास 30 असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटाला धमक्या दिल्या होत्या. महाराष्ट्रात येऊन दाखवा, असे इशारेही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आणि एकूणच महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा प्रमुख मोहरा असल्यानं एकनाथ शिंदे यांना एवढी मोठी सुरक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं पुरवण्यात आली . एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा ताफा ज्या ज्या रस्त्यावरून जातील, त्या रस्त्यावरील प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.