महाराष्ट्रात राहणार की दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात…
स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच ते दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली : मागील मोठ्या काळापासून माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, यावर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Devendra Fadnavis on Delhi Politcs). जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत मी कोठेही जाणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते परळीत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला भाषणाआधी काही जणांनी विचारलं, तुम्ही दिल्लीला चालला आहात का? मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. या महाराष्ट्रात जोपर्यंत पुन्हा भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. या महाराष्ट्रातच संघर्ष करुन पुन्हा भाजपचं, शिवसंग्राम आणि आपल्या युतीचं सरकार आणल्याशिवाय मी राहणार नाही.”
जनतेने तर आपल्याला मतं दिली, जनतेनं आपल्याला जागा दिल्या. हे तर यांनी राजकीय गणितं बिघडवली आणि राजकीय हाराकिरी करुन आपलं सरकार होऊ दिलं नाही. हे जे सरकार येथे काम करत आहेत, हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. जनतेने निवडून दिलेलं सरकार तर भाजपचं होतं. जनतेने भाजपसह युतीला जनतेने बहुमत दिलं होतं. मात्र, यांनी राजकीय हाराकिरी करुन सरकार बनवलं. हे फार काळ टिकणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.
राजकीय हाराकिरी फार काळ टिकणार नाही. लोकशाहीत हे चालत नाही. जनतेच्या मनात जे आहे तेच सरकार लोकशाहीत तयार होतं. म्हणून मला विश्वास आहे की आपल्या मेहनतीतून भविष्यात याही पेक्षा मोठं यश मिळेल. त्यासाठी आपण सर्व खांद्याला खांदा लावून एक टीम म्हणून, एक ताकद म्हणून महाराष्ट्रात काम करु, असंही फडणवीस म्हणाले.
संंबंधित बातमी:
Devendra Fadnavis on Delhi Politcs