मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ही अनैसर्गिक युतीची सत्ता आहे. ती जास्त काळ टीकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली (Devendra Fadnavis Criticize MVA Government ). नुकतीच विधीमंडळ अधिवेशनाचीही तारीख ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून सरकारला घेरण्याचे पूर्ण प्रयत्न केले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून फडणवीसांनी सरकारविरोधातील आपली टीका तीव्र केल्याचे पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सरकारकडे लक्षच देत नाही. कारण महाविकासआघाडी सरकारमध्ये अनेक आंतरविरोध आहेत. हे सरकार आंतरविरोधाने भरलं आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचं तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. त्यामुळे ते काय म्हणतात हे काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. ही अनैसर्गिक युती आहे. अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी कधी टिकली नाही.”
यावेळी त्यांनी धोकादायक इमारतींचाही मुद्दा उपस्थित केला. धोकादायक इमारतींची संख्या किती आहे हे तपासलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सुशांत सिंह प्रकरणावर बोलताना त्यांनी लवकरच सीबीआय चौकशी पूर्ण करेल आणि सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच काँग्रेसने आत्मचिंतन करावं. काँग्रेस पक्षाला आपला अध्यक्ष देखील ठरवता येत नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेस वादावर काँग्रेसला टोला लगावला.
केंद्राचे निर्णय राज्य सरकार लागू करत नाही. ई पासच्या मुद्द्यावर राज्य सरकारची विसंगती दिसतेय. एसटीला ई-पास नाही, मग खासगी वाहनांना का? असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
“आमच्या आमदारांची मंजूर कामं रद्द केली, याविरोधात उच्च न्यायालयात जाणार”
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आघाडी सरकारने काँग्रेसच्या आमदारांना निधी न देता विरोधकांना निधी दिल्याच्या चर्चेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “विरोधी पक्षांना काही देण्यात आलेलं नाही. आमच्या आमदारांची मंजूर झालेली कामं रद्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी न्याय न दिल्यास आम्ही याविरोधात उच्च न्यायलयात जाणार आहोत.” मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील असून सरकारने या विषयाबाबत गंभीर राहावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.
हेही वाचा :
पावसाळी अधिवेशन | कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आमदारांना विधिमंडळात प्रवेशबंदी
पत्राचा विषय संपवून संघटन स्तरावर जोमाने कामाला लागण्याचे सोनियांचे आदेश : राजीव सातव
काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात
संबंधित व्हिडीओ :