कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं भाष्य
कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिलीय.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला हाणलाय. कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिलीय. ( Devendra Fadnavis criticizes NCP over Sharad Pawar and Prashant Kishor meeting)
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुसाठी स्ट्रॅटेजी आखण्याबाबत चर्चा झाल्याची बोललं जात आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. कुणी कितीही रणनिती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी केलाय.
राहुल शेवाळेंच्या आरोपाला प्रत्युत्तर
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. परिणामी हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या सरकारमधील नेत्यांना सकाळी उठून जे वाक्य सर्वात आधी तोंडात येतं ते म्हणजे अमुक बाबीसाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीका फडणवीसांनी केलीय.
‘वारीला परवानगी द्यायला हवी होती’
कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या पायी वारी करण्यासाठी वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती. मुळातच त्यांनी 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांचे ठरावही घेतले होते. त्यामुळे सरकारने पायी वारीला परवानगी द्यायला हवी होती, असंही फडणवीस यांनी म्हटलंय.
‘नक्षलवाद्यांच्या पत्रकाची चौकशी करा’
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होतील. यापूर्वी आमचं सरकार असतानाही ज्या ज्या ठिकाणी मराठा मोर्चे निघाले, त्या ठिकाणचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. समाजाच्या मागणीला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असणं स्वाभाविक आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच नक्षल विचार हा मुळातच विविध समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या पत्रकाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय.
संबंधित बातम्या :
Mumbai Rains: मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली, शिवसेना खासदाराचा दावा
Devendra Fadnavis criticizes NCP over Sharad Pawar and Prashant Kishor meeting