मुंबई : सध्या राज्यात वेगवान घडामोडी पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडल्यानंतर सेनेत सुरू झालेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आणि नेत्यांचं प्रमाण अधिक आहे. ही गळती थांबवण्याचं मोठ आव्हान सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात आदित्य ठाकरे सध्या दौरे काढत आहेत. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून शिवसेनेने आता संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला असून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा वारंवार शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. गेली अनेक वर्ष न चुकता शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचं आयोज करण्यात येते. मात्र यंदा शिवाजी पार्कवर कोण दसरा मेळावा घेणार? एकनाथ शिंदे गट की उद्धव ठकरे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता जे नियमात आहे तेच होईल, नियमाच्या बाहेर या सरकारमध्ये काहीच होणार नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कमध्ये यंदा कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
काँग्रेसमध्ये सध्या काहीच अलबेल नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाशी एकनिष्ठ अशी ज्यांची ओळख होती त्या गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. याबबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता काँग्रेस पक्षाची स्थिती बुडत्या जहाजासारखी आहे, त्यामुळं अनेक लोकं पक्ष सोडून जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.