2024 लोकसभा निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीसांकडून स्वबळाचे संकेत
2024 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर : 2024 मधील लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल, असा नारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis Ramtek Speech) दिला आहे. त्यामुळे भाजप आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या शक्यतेला बळ मिळालं आहे.
2022 मध्ये महापालिका निवडणुकीत नागपूर शहरात भाजपचा झेंडा फडकेल, 2024 मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रामटेकमध्ये आयोजित भाजपच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
गेली अनेक वर्ष नागपूर जिल्हा भाजपचा गड म्हणून पाहिला जातो. जिल्ह्यात आपल्याला यश कमी आलं असेल, पण त्याची कारणं वेगळी आहेत. एखाद्या निवडणुकीने आमच्या ताकदीचं मूल्यमापन होऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
जिल्हा परिषदेतील पराभवाने खचून जाऊ नका, चिंता करु नका, नागपूर जिल्ह्यात भाजपची ताकद कमी झाली नाही. कुठल्याही पराभवानंतर आत्मचिंतन केलंच पाहिजे, सुधारुन पुढे गेलंच पाहिजे, असा विश्वास फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
‘सीएए’ समर्थनार्थ देवेंद्र फडणवीसांच्या व्याख्यानाला काँग्रेसचा विरोध
येणाऱ्या काळात पुन्हा जोमाने काम करु. नागपूर जिल्ह्यात 2024 साली रामटेक लोकसभेचा खासदार भाजपचा असेल, हे माझं भाकित लिहून ठेवा, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. सध्या शिवसेनेचे कृपाल तुमाने रामटेकमध्ये सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत.
दरम्यान, राज्यातील सरकारचा रिमोट ‘सिल्व्हर ओक’वर असून त्याची बॅटरी दिल्लीत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. कामं थांबवणारं सरकार जास्त टिकत नाही, असा घणाघातही त्यांनी केला.
सत्तेमुळे काही लोकांची भाषा बदलली आहे. हिंमत असेल तर ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’चं (सीएए) समर्थन करून दाखवा, सावरकरांच्या मुद्द्यांवर भूमिका घ्या, असं आव्हानही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला (Devendra Fadnavis Ramtek Speech) दिलं.