मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी (shivsena) बंडखोरी केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जर 40 आमदारांचा पाठिंबा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये कोण नवा मुख्यमंत्री होणार? पुढच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती असणार याबाबत उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सध्या पक्षीय बलाबल पहाता देवेंद्र फडणवीस हे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहू शकतात असे बापट यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे जर 37 आमदार असतील तर भाजपाचे आणि हे आमदार मिळून भाजपाकडे बहुमत होते. अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि देवेंद्र फडणवीस हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असे त्यांनी सांगिले आहे.
सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर भाष्य करताना बापट यांनी म्हटले आहे की, जर समजा एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 37 आमदारांनी पाठिंबा दिला. तर भाजपाचे आमदार आणि शिवसेनेचे फुटलेले 37 आमदार मिळून सत्ता स्थापनेचा दावा करू शकता. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांना उरलेले अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहाता येईल. अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नाही तर अशावेळी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरेल. दोन्ही पक्षांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाईल. जो पक्ष बहुमत सिद्ध करेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल. मात्र सध्या तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक वाटत असल्याचे बापट यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना उल्हास बापट यांनी म्हटले आहे की, जर समजा फडणवीस यांनी देखील अडीच वर्ष मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत निवडणुका घ्याव्या लागतील. या निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री पुढील पाच वर्ष असेल. जर मध्यवर्ती निवडणुका झाल्यास त्याचा फायदा म्हणजे राज्याला स्थिर सरकार मिळण्याची अधिक शक्यता आहे.