म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी, फडणवीसांचा गंभीर आरोप
राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नसल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
गोंदिया : राज्यात कोरोना संकटाच्या काळात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने विळखा घातल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागात म्युकरमायकोसिसमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अशावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारची ही घोषणा फसवी आहे. राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नसल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. (Devendra Fadnavis makes serious allegations against Thackeray government over Mucormycosis)
महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचाराचा सर्व खर्च केला जाईल. तसंच त्यांना लागणाऱ्या औषधाच्या खर्चाचा समावेशही या योजनेत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसंच म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश या योजनेत केल्याचं परिपत्रकही राज्य सरकारनं जारी केलं आहे. अशावेळी राज्यात कुठेही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीची ही घोषणा फसवी आहे. असा आरोप फडणवीस यांनी केलाय. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसचा रुग्ण कोणत्याही रुग्णालयात भरती असेल तर त्याला मोफत इंजेक्शन्स देण्यात यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केलीय. महाविकास आघाडी सरकार बनवाबनवी करत आहे असं आपण म्हणत नाही, पण सरकारने जनताभिमुख कामे करावी, असा सल्लाही फडणवीसांनी यावेळी दिलाय.
कोरोनाचे आकडे लपवले जात आहेत- फडणवीस
महाविकास आघाडी सरकारकडून कोरोना रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी लपवले जात असल्याचा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इतकंच नाही तर कोरोना रुग्णांचे आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे आकडे लपवले जात असल्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. फडणवीस यांनी यापूर्वीही अशा प्रकारचा दावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोना मृत्यूच्या आकड्यात बदल करुन सुधारणा करण्यात आली होती.
धान खरेदीसाठी भाजप आंदोलन करणार
गोंदिया जिल्ह्यात कुठेही धान खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. अनेक संस्थांचे गोडावून फक्त कागदावर आहेत. त्यामुळे भाजपकडून जिल्हा स्तरावर धान खरेदीसाठी आंदोलन केलं जाईल, अशा इसाराही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
धान घोटाळ्यात 111 नमूने केंद्रीय संस्थांनी घेतले होते, सारेच्या सारे बोगस निघाले. कोरोना असला तरी, राज्य सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार असेल तर भाजपाला मैदानात उतरावेच लागेल. ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद…#PaddyScam #धान_घोटाळाhttps://t.co/MAa63KPiiy@TV9Marathi pic.twitter.com/zth2aMhdJh
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2021
संबंधित बातम्या :
आघाडी सरकारचा सामाजिक न्याय बोलण्यापुरताच; देवेंद्र फडणवीसांची टीका
उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ
Devendra Fadnavis makes serious allegations against Thackeray government over Mucormycosis