फडणवीस पुढचं बजेट मांडण्याची शक्यता, चंद्रकांत पाटील-पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात नवी जबाबदारी?
केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये देवेंद्र फडणवीसांकडे अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवी जबाबदारी (Devendra Fadnavis Modi Government) सोपवली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये फडणवीसांकडे अर्थमंत्रिपदाची धुरा सोपवली जाण्याची चर्चा आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजधानीत असलेल्या फडणवीसांना आनंदवार्ता मिळण्याची चिन्हं आहेत.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारमण यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये सीतारमण यांनी काही काळ संरक्षण मंत्रालयही सांभाळलं आहे. परंतु सीतारमण यांच्या कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीसे नाखुश असल्याचं म्हटलं जातं. अर्थसंकल्पानंतर मोदींच्या नाराजीत भर पडल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सुपूर्द केली जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुढचा केंद्रीय अर्थसंकल्प फडणवीस मांडू शकतात.
महाराष्ट्रातून भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या. अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर यांसारख्या नेत्यांच्या निधनाने केंद्रीय मंत्रिमंडळात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यासारखा क्लीन चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांना पसंती आहे. तसं झाल्यास देवेंद्र फडणवीसांना थेट मोदी सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत फडणवीसांचे संबंध ताणल्यामुळे, त्यांना केंद्रात आणून राज्यातील भाजप-शिवसेना संबंध पुन्हा सुधारु शकतात, अशी आशा भाजपला आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळू शकते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव रेसमध्ये आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याची ‘गुड न्यूज’ मिळू शकते.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवलं गेल्यास भाजपच्या प्रदेशाध्यपदी कोण? हा प्रश्न निर्माण होतो. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीवर महाराष्ट्रातील फेरबदल अवलंबून आहेत. फडणवीसांना केंद्रात मिळणारी संधी महाराष्ट्रातील नेत्यांसाठी अनेक जागा निर्माण करणारी आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास नितीन गडकरी-प्रकाश जावडेकरांच्या सोबतीने महाराष्ट्रातील आणखी एक चेहरा केंद्रात काम करताना (Devendra Fadnavis Modi Government) दिसेल.