एक नवा पैसाही केंद्राला पाठवला नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी फडणवीसांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Ananth Kumar Hegde) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई: भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी फडणवीसांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत केलेल्या गौप्यस्फोटाबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Ananth Kumar Hegde) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Ananth Kumar Hegde) यांनी अनंत कुमार हेगडे यांचा दावा फेटाळून लावला आहे. “केंद्राला एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही, केंद्राकडून पैसा आलाच नाही, शिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले”, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे (BJP leader Ananth K Hegde on Devendra Fadnavis oath ) यांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं.
देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
“अनंत हेगडे नेमकं काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जे काही मीडियातून समजतंय, त्यावरुन मला माहिती मिळतेय. अनंत हेगडेंचा दावा शंभर टक्के धादांत खोटा आणि चुकीचा आहे. एक नवा पैसादेखील महाराष्ट्राने केंद्र सरकारला परत केलेला नाही. मुळातच बुलेट ट्रेनकरिता एक नवा पैसा केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी एक कंपनी तयार झालेली आहे. जी केंद्र सरकारची आहे. जेव्हा केव्हा बुलेट ट्रेनचे पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीमध्ये येतील, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही केवळ जमीन हस्तांतरणाची आहे.
ज्यांना अकाऊंटिंगची पद्धत समजते, त्यांना असे पैसे आले, आणि परत पाठववले असं कधी होत नाही हे कळतं. तसंही मी जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, किंवा मुख्यमंत्री होतो, निवडणुकीनंतर किंवा त्याकाळात एकही धोरणात्मक निर्णय मी घेतलेला नाही. जोपर्यंत नियमित सरकार येणार नाही, तोपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार नाहीत, हे मी जाणीवपूर्वक सांगितलं होतं. त्यामुळे धादांत खोटं, चुकीचं पसरवण्यात येत आहे. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की एक नवा पैसादेखील महाराष्ट्राचा केंद्राला गेला नाही, केंद्राने तो मागितलेला नाही. मागण्याचा विषय येत नाही, देण्याचा विषय येत नाही”.
संबंधित बातम्या
भाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट, 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले