“माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केलाय...
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला. यावर विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलंय. “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी हे विधान केलंय.
फडणवीस काय म्हणाले?
बच्चू कडू माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना मी स्वत: फोन केला. त्यांना म्हटलं की आपल्याला सरकार बनवायचंय. आमची अशी इच्छा आहे की आपण युतीत असावं. त्यामुळे आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे. या माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असं फडणवीसांनी सांगितलं.
माझ्या फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले. त्यामुळे बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, खोके घेतले, असं म्हणणं चुकीचं आहे. बाकी इतरांबाबत मी बोलत नाही. पण याचा अर्थ बाकीच्या लोकांनी सौदा केला, असं म्हणणं नाही. पण ते लोक माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लावलेले आरोप चुकीचेच आहे, असं फडणवीस म्हणालेत.
माझ्या माहिती प्रमाणे, गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गेले होते. त्यांच्यात कुठलाही व्यवहार झाला नव्हता, असंही फडणवीस म्हणालेत.
राणा- बच्चू कडू यांच्यातील वाद
रवी राणा यांनी काही दिवसांआधी एक विधान केलं. त्यात बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. रवी राणा यांच्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला. मी कुठलेही पैसे घेतलेले नाहीत. त्यामुळे हे असे आरोप करणं चुकीचं आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. शिवाय सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच असे आरोप केल्याने सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं होतं.
रवी राणा यांनी माफी मागावी, या मागणीवर बच्चू कडू ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची जाहीर माफी मागितली आहे.