Devendra Fadnavis : महायुतीचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मी शर्यतीत…
Devendra Fadnavis on CM : देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाष्य केले आहे. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसतील हे स्पष्ट केले होते. तर फडणवीस यांनी पण महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. काल टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी संख्याबळावर मुख्यमंत्री होईले असे सांगीतले. त्यांनी थेट संकेत दिले आहेत. तर यापूर्वीच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे जाहीर केले होते. तर आता देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलं आहे.
शरद पवारांच्या पत्रामुळे राष्ट्रपती राजवट
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौफ्यस्फोट केला. राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी पवारांची सूचना होती. त्याप्रमाणे या गोष्टी घडल्याचे फडणवीस म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी शरद पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र हे महत्त्वाचं होतं. ते पत्र आपल्याच कार्यालयात टाईप करण्यात आलं होतं. या पत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पवारांनी त्यात काही बदल सूचवले होते, असा बॉम्बगोळा फडणवीस यांनी टाकला.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केले. पण नंतर भाजपाच्या गोटातून लागलीच सारवासारव झाली. तर आता आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तशी भावना असणे स्वाभाविक आहे. त्यांच्या भावनेला प्राधान्य देता येत नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पदाची कुठलीही शर्यत नाही. मी अशा कुठल्याही शर्यतीत सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राज्याचं नेतृत्व करत होतो. त्यात राज्यात अपयश आलं. तरीही पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला. आता विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. माझ्यासाठी ही बाब पुरेशी असल्याचे फडणवीस म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला.
मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील अस ते म्हणाले. त्यामुळे आता महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कोणताच वाद होऊ नये याची दक्षता भाजप घेत असल्याचे दिसून येते. मित्र पक्षांना नाराज न करण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. कारण निवडणुकीपूर्वी तीनही पक्ष मुख्यमंत्री पदावरून आक्रमक दिसले होते.