मुंबई : बुलढाण्यातील चिखलीच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक जुनी ऑडिओ क्लिप दाखवत देवेंद्रजी, जरातरी लाज बाळगा म्हटलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. “उद्धव ठाकरेंनी जना नाही तर मनाची तरी लाज बाळगावी”, असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणालेत.
महावितरणने पहिल्यांदाच असं पत्र काढलंय की फक्त सध्याचं चालू वीज बिल घ्यायचं. थकित बिलाची मागणी करायची नाही, त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्यांनी जनाही लाज बाळगली पाहिजे आणि मनाचीही लाज ठेवली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. शेतकऱ्यांच्या वीजबिलावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. विशेषत: उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे.
वीजबिल माफ करू असं मी कधीच म्हटलं नाही. कोरोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीजबिल स्थगित आणि नंतर माफ केलं होतं. तसंच महाराष्ट्रातही करावं. तोच पॅटर्न राबवावा, अशी मी मागणी केली होती. पण तत्कालिन ठाकरे सरकारने एक रुपयाचीही सूट शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलायचा अधिकारच नाहीये, असं फडणवीस म्हणालेत.
बुलढाण्यातील चिखलीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. भरसभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लीप लावली.विरोधात असताना वीजबील माफ करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. ती क्लीप लावून आता शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.