हिंदूहृदयसम्राट सावरकर दैवत, हक्कभंग आला तरी सावरकरांवर बोलणार, फडणवीस आक्रमक
महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांवर बोलू दिलं जात नाही, याचा आम्ही निषेध करतो' असं देवेंद्र फडणवीस सभागृहाबाहेर म्हणाले.
नागपूर : शेतकरी प्रश्न आणि सावरकरांच्या मुद्द्यावर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं. भाजप आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केल्यानंतर विधीमंडळ सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर येऊन ठाकरे सरकारवर निशाणा (Devendra Fadnavis on Sawarkar) साधला.
‘सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल, तर ती काय कामाची? हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचं दैवत आहेत. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, पण सावरकरांवर बोलू द्यायलाच लागेल. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सावरकरांवरील वक्तव्याबाबत माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील’ असा इशारा फडणवीसांनी दिला.
‘सभागृहात अभूतपूर्व घटना घडली. सावरकरांविषयी बोलताना तो भाग कामकाजातून काढून टाकला. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा हा अपमान आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांवर बोलू दिलं जात नाही, याचा आम्ही निषेध करतो’ असं देवेंद्र फडणवीस सभागृहाबाहेर म्हणाले.
‘ही विधानसभा ब्रिटिशांची नाही, तर महाराष्ट्राची आहे, ही लाचारी कशासाठी? हे आम्ही सहन करणार नाही, आम्ही सावरकरांवर बोलणारच, आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, राहुल गांधी माफी मागेपर्यंत आम्ही शांत राहणार नाही’ असंही देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.
’16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या. पण त्यात शेतकऱ्यांना केवळ 4500 कोटींचा निधी आहे. पूरग्रस्तांसाठी आकस्मिक निधी ठेवण्यात आला, ते परत देण्याचा उल्लेख दिसला. शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांचा निधी असल्याचा उल्लेख दिसला. सरकारच्या कृतीचा निषेध करतो, शेतकऱ्यांना 25 हजारांची हेक्टरी मदत तात्काळ द्यावी’ अशी मागणीही फडणवीसांनी केली.
सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर विरोधकांनी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळात सभेचं कामकाज सुरुच राहिलं. विरोधकांनी वीर सावरकराचं पोस्टर फडकावलं. भाजपचे सर्व आमदार ‘मी पण सावरकर’ लिहिलेली टोपी घालून सभागृहात आले (Devendra Fadnavis on Sawarkar) होते.
Nagpur: BJP MLAs including former Chief Minister Devendra Fadnavis arrive for assembly’s winter session wearing ‘I am Savarkar’ caps https://t.co/wNyohx585c pic.twitter.com/ZAtmdoglDx
— ANI (@ANI) December 16, 2019