‘द काश्मीर फाईल्स’मध्ये सत्य दाखवलंय, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
'द काश्मीर फाईल्स' सिनेमावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया...
मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमात वास्तव दाखवलं गेलंय. काश्मिरी पंडितांवरील अन्यायावर या सिनेमातून भाषिय करण्यात आलंय. या सिनेमासाठी रिसर्च केला गेला आहे. अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला गेलाय, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमावरून सध्या जोरदार दावेप्रतिदावे सुरु आहेत. काश्मीरी पंडितांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या सिनेमावरून मविआ आणि युतीच्या नेत्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.
‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केला. त्यामुळे या सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत म्हणालेत.
पोलीस भरतीसंदर्भातही त्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. पोलीस भरतीसाठी सरकारकडें 11 लाख 80 हजार अर्ज आले आहेत. मात्र काही ठिकाणाहून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत राज्य सरकार 15 दिवसांची मुदत वाढवून देत आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक तरूणांना याची मदत होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.