आमच्याकडे बहुमत नाही, मी राजीनामा देतोय, तीनचाकी सरकारला शुभेच्छा : देवेंद्र फडणवीस
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.
मुंबई : दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं सांगितलं. त्यामुळे अवघ्या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले.
बहुमतासाठी आवश्यक आमदार आमच्याकडे नाहीत त्यामुळे मी राजीनामा देतं आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis press conference) उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची टांगती तलवार होती. देवेंद्र फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा करण्याची शंका होती. ती खरी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.
देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकासआघाडीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे बहुमत नसल्याचं मान्य केलं. त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्त्वातील सरकार अवघ्या 79 तासात कोसळलं.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद लाईव्ह
या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” जनतेने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला दिलं. भाजपला जनादेश दिला. आम्ही सेनेसोबत निवडणूक लढलो. भाजपला मोठा जनादेश होता, सेनेने लढलेल्या जागांपैकी 40 टक्के जागा जिंकल्या. शिवसेनेच्या लक्षात आल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेपासून सेनेनं बर्गेनिंग सुरु केलं, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं, भाजपने कधीच मुख्यमंत्रिपद देऊ असं शिवसेनेला सांगितलं नव्हतं, न ठरलेल्या बाबींचा बाऊ करुन शिवसेनेने अडमुठेपणा केला, मुख्यमंत्रिपद दिलं नाही तर आम्ही कोणासोबतही जाऊ अशी भाजपला धमकी दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
न ठरलेल्या बाबींचा बाऊ करून शिवसेनेने भाजपला धमकी दिली, परंतु आमच्यासोबत चर्चा करण्याऐवजी काँग्रेस-एनसीपी सोबत चर्चा केली. जे लोकं मातोश्रीबाहेर पडत नव्हते ते इतरांच्या पायऱ्या झिजवत होते. आमच्याशी बोलत नव्हते. अशातच राज्यपालांनी आमंत्रित केलं आणि सत्तास्थापनेस सांगितलं. मात्र, आम्ही आमच्याकडे संख्याबळ नसल्याचं सांगत सत्ता स्थापण्यास नकार दिला. शिवसेनेला बोलावलं त्यांनी त्यांचं कसं हसं करुन घेतलं ते महाराष्ट्राने पाहिलं. राष्ट्रवादीला देखील बोलावण्यात आलं मात्र त्यांनी देखील नकार दिला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सत्तास्थापनेचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम म्हणजे भाजपला दूर ठेवा हा त्यांचा प्रयत्न होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र, हे तिन्ही पक्ष विरोधी विचारधारेचे असल्यानं हे सरकार टीकणार नव्हतं.
अजित पवार यांनी आम्हाला सरकार स्थापनेस मदतीची तयारी दाखवली. त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं. त्यामुळे आम्ही चर्चा करुन सरकार स्थापन केलं. मात्र, त्यांनी काही कारणांमुळे राजीनामा दिला. आता आमच्याकडे देखील बहुमत उरलेलं नाही. त्यामुळे मी राज्यपालांकडे राजीनामा देत आहे.
मला विश्वास आहे तीन पक्ष चांगले सरकार चालवतील. त्यांना माझ्या शुभेच्छा. शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. सत्तेसाठी किती लाचारी शिवसेनेच्या नेत्यांना स्वीकारावी लागते. भाजप हटावचा अजेंडा घेऊन हे सगळे लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत. भाजपा प्रभावी विरोधी पक्षाचे काम करेल, जनतेचा आवाज म्हणून त्यांना न्याय देण्याचे काम करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तीन चाकाचे सरकार
साशंकता आहे, दोन चाकाचे सरकार वेगाने धावते, पण तीन चाकाच्या सरकारची अवस्था ही वाईट होणार आहे. तीन चाके रिक्षाला असतात, जर ती चाकं तिन्हीवेगवेगळ्या दिशेने जाऊ लागली, तर तशीच अवस्था या सरकारची होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही चांगले काम केले म्हणून आम्हाला जनतेने पुन्हा निवडून दिले. शेती, इन्फ्रास्ट्क्चर, मुंबईचा कायापालट केला. पाच वर्ष अहोरात्र कुठलीही सुट्टी न घेता मी जनतेकरिता कामं केले. मी जनतेचे आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अजित पवारांचा राजीनामा
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. अजित पवार यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन आपला राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येत आहे.
अजित पवारांनी पदभार स्वीकारलाच नाही
देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा पदभार काल स्वीकारला. त्यामुळे अजित पवारही कालच उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार होते. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाच नसल्याचं समोर आलं. मंत्रालयात गेलेले अजित पवार कार्यभार न स्वीकारताच चर्चगेटमधील घरी (Ajit Pawar Returns without taking charge) परतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणीचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरण्याची चिन्हं दिसत होती.