करीम लाला-इंदिरा गांधींविषयी राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांचे गांधी कुटुंबाला तीन प्रश्न
राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी काही बोलणार आहेत की गप्प बसणार आहेत?' असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे.
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीगाठी होत असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी गप्प का आहेत? काँग्रेसने राऊत यांच्या आरोपांना उत्तर न दिल्यास त्यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असं मानलं जाईल, असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis on Karim Lala) केला आहे.
‘काँग्रेस अंडरवर्ल्डच्या भरोशाने त्यावेळी निवडणुका जिंकत असल्यामुळे ‘अशा’ भेटी व्हायच्या का? काँग्रेसला अंडरवर्ल्डकडून आर्थिक पाठबळ मिळत होतं का? की काँग्रेसला त्यावेळी शक्तीची (मसल पॉवर) गरज असल्यामुळे अशा भेटीगाठी घडत होत्या?’ असे तीन प्रश्न फडणवीसांनी विचारले. ‘संजय राऊत यांच्या दाव्यानुसार ‘काँग्रेसराज’ असताना मुंबई आणि महाराष्ट्र हे अंडरवर्ल़्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील चालवत होते, हे खरं आहे का? यावर काँग्रेसने उत्तर द्यावं’ अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
‘काँग्रेसच्या 1960 ते 1980 दरम्यानच्या काळात मुंबई पोलिस आयुक्तांची नियुक्ती अंडरवर्ल्ड करत होतं, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. ही गोष्ट काँग्रेसला मान्य आहे का? इंदिरा गांधी करीम लाला याला भेटायच्या का? त्यानंतर असे निर्णय व्हायचे का? याचं उत्तर काँग्रेसला द्यावं लागेल’ असंही फडणवीस म्हणाले.
‘करीम लाला त्याकाळी सेलिब्रिटीप्रमाणे मंत्रालयात यायचे, त्यांना बघायला लोकांची झुंबड उडायची. सोनिया गांधी यांना हे मान्य आहे का? राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची सुरुवात तेव्हाच झाली होती का? त्याला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त होता का? इंदिरा गांधी यांच्याविषयी जे बोललं गेलं, त्यावर राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी काही बोलणार आहेत की गप्प बसणार आहेत?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे.
करीम लाला-इंदिरा गांधी भेटीविषयीचं वक्तव्य मागे घ्या, देवरा-निरुपम यांचं एकमत
‘तुम्ही ज्यांच्यासोबत सत्ता चालवता, त्यांचे एक वरिष्ठ नेते असं वक्तव्य करतात. सत्तेशी तुमची अशाप्रकारे सौदेबाजी झाली आहे का? की तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर झालेल्या आरोपांना तुम्हाला उत्तरही देता येत नाहीये. काँग्रेसने अधिकृत उत्तर न दिल्यास संजय राऊत यांचे दावे खरे मानले जातील’ असं फडणवीसांनी सुनावलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसं इंदिरा गांधीही भेटत होत्या, असं संजय राऊत मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्टीकरण दिलं. देशातील अनेक नेते करीम लाला याला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेट देत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असं संजय राऊत म्हणाले.
करीम लाला कोण होता?
अब्दुल करीम शेर खान हे करीम लाला याचं संपूर्ण नाव. 1920 मध्ये तो अफगाणिस्तानहून आपल्या कुटुंबासह मुंबईला आला. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात असलेल्या गरीब मुस्लिम वस्तीत त्याचं कुटुंब राहत होतं.
मुंबईतील पठाणांच्या एका संघटनेत करीम लाला कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला. मारवाडी, गुजराती समाजातील सावकार, जमीनदार, व्यापारी यांच्यासाठी एजंट म्हणून अवैध वसुलीचं काम त्याने सुरु केलं.
1960 ते 1980 च्या दरम्यान मुंबईतील तीन माफिया डॉनपैकी एक होता. दोन दशक तो खतरनाक पठाण गँगचा प्रमुख होता. पठाण गँगचा म्होरक्या झाल्यानंतर तो कुख्यात सुपारी किलर झाला. सत्तरच्या दशकात त्याने हाजी मस्तान आणि वरदराजनसोबत हातमिळवणी केली. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनाही तो आपल्या ‘दावत’चं निमंत्रण द्यायचा. 2002 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
Devendra Fadnavis on Karim Lala