5 वर्ष 8 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Devendra Fadnavis Resign as CM) दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.
यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच मंत्रिमंडळही बरखास्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार चालवा अशी विनंती करु शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना अधिकार दिले जातील, मात्र त्यांना कोणतेही धोरणात्मक अधिकार मिळणार नाहीत अशी माहिती विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे यांनी (Devendra Fadnavis Resign as CM) दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख कुशल युवा राजकारणी म्हणून केली जाते. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्रिपद असा यशस्वी टप्पा देवेंद्र फडणवीस यांनी पार केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला. 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.
अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : नितीन गडकरी
देवेंद्र फडणवीस यांचं शिक्षण नागपूरमधील सरस्वती शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आणि कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करुन त्यांनी डी. एस. ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट या डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं.
राजकीय टप्पे :
- 1989 : भाजप युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
- 1990 : पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
- 1992 : नागपूर शहराचे अध्यक्ष
- 1994 भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
- 1999 ते आतापर्यंत : विधानसभा सदस्य
- 1992 ते 2001 सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
- 2001 भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
- 2010 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
- 2013 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
देवेंद्र फडणवीस यांनी 1990 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1992 आणि 1997 मध्ये सलग दोनदा नागपूर पालिकेत ते निवडून आले. सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ओळख आहे. इतकंच नव्हे तर महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेयर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे फडणवीस हे पहिले आहेत.
अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती यासह विविध समित्यांवर मुख्यमंत्र्यांनी काम केले आहे.
Devendra Fadnavis Resign as CM