Devendra Fadnavis : फडणवीसांची सत्तेबाहेर राहण्याची घोषणा, पंतप्रधान मोदींच्या 2 फोननंतर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी!

| Updated on: Jun 30, 2022 | 7:39 PM

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांची सत्तेबाहेर राहण्याची घोषणा, पंतप्रधान मोदींच्या 2 फोननंतर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी!
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आणि मी सत्तेच्या बाहेर राहणार, पण सरकार चालावं ही माझी जबाबदारी असेल, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलं. फडणवीसांच्या या घोषणेनंतर केंद्रीय भाजपमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा आग्रह केला. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी फडणवीस यांना दोन फोन केले आणि सरकारमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर अखेर फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असणार आहेत.

जे. पी. नड्डांचा फडणवीसांना आग्रह

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. ट्विट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा भाग व्हावे, असे म्हटले आहे. अशाप्रकारचा निर्णय भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, याची माहिती त्यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे. त्यांनी आपले मोठे मन दाखवत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले तर आपण स्वत: सरकारबाहेर राहत या सरकारला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य देऊ, असे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांची ही भूमिका पक्षाचे चारित्र्यही दाखवते आणि हेदेखील दाखवते, की आम्ही कोणत्याही पदासाठी लालसा दाखवत नाही, असे नड्डा म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘आपलेही योगदान द्यावे’

आम्ही पदासाठी नाही, तर विचारासाठी आहोत. विचारांना पुढे नेत असताना राज्याचा विकास व्हावा, राज्यातील जनतेचा विकास व्हावा, लोकांच्या इच्छा, मागण्या पूर्ण होवोत. या सर्व गोष्टींचा विचार करता देवेंद्र फडणवीस यांनी हा विचार केला आहे. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद लावावी आणि महाराष्ट्र एक विकसित राज्य होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपा तसेच 16 अपक्ष आमदार एकत्र आले आहेत. अजूनही काही जण येत आहेत. मी बाहेर असेल. पण सरकार चालेल, ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचे आणि बाळसाहेबांनी मांडलेल्या हिंदुत्ववादाने भरलेले हे सरकार असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे व्हिजन दाखवले, ते पुढे नेणार, असे ते म्हणाले होते. मात्र आता जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणार आहे.