निवडणुकीत समन्वयाचा अभाव, देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा कुणावर? प्रवक्त्यांनाही कानपिचक्या
या निवडणुकीत पाहिजे तसं यश आलं नाही. काही हरकत नाही. पुन्हा एकदा मैदानात उतरू. पुन्हा एकदा मैदान फतेह करू हा विश्वास आहे. निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलो आहे. पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा रोवत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणुकीत महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आम्ही मित्र पक्षांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. पण आता एकमेकांची उणीदुणी काढण्यात काही अर्थ नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रवक्त्यांना कानपिचक्या दिल्या. हा कानपिचक्या देताना त्यांनी नितेश राणे यांचंही नाव घेतलं. महायुतीतील सर्वच प्रवक्त्यांनी आता समजून उमजून बोललं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांचा पूर्ण रोख महायुतीतील मित्र पक्षांच्या दिशेने होता.
काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला आहे. तो टिपलेला आहे. तो जाहीरपणे बोलण्याची गरज नाही. मी आपल्या मित्र पक्षांच्या नेत्यांना सांगणार आहे. कोणत्या कोणत्या आमदारांच्या मतदारसंघात समन्वय नव्हता हे सांगणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
एकामेकांवर आरोप नको
यावेळी फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना शहाजोगपणाच्या चार गोष्टीही सुनावल्या. कधी कधी पराजय होतो. पण त्याचं खापर एकमेकांवर फोडू नका. या निवडणुकीत समन्वयाचा अभाव दिसला. मी मित्र पक्षांना सांगणार आहे. मित्र पक्षाचं काम आपण प्रामाणिकपणे केलं आहे. आपले प्रवक्ते बोलतात. जे बोलतात ते समजून आणि उमजून बोललं पाहिजे. उणेदुणे काढण्याची ही वेळ नाही. एकमेकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांनाही सांगितलं. वेगवेगळी विश्लेषणं करू नका. सर्वांनी एक सूरात बोललं पाहिजे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू नका. ही ती वेळ नाही. आता कामाला लागा. दीड टक्के मते अधिक मिळवली तरी आपण विधानसभा जिंकू शकतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फक्त एक टक्का मते कमी
मराठवाड्यात मराठा समाजाचा नरेटिव्ह तयार केला. मराठा समाजाला दोन्ही वेळा आऱक्षण आपण दिलं. सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शुल्क आणि सवलती या सर्व गोष्टी आपल्याच काळात झाल्या. 1980पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मराठा मते गेली. याचा अर्थ एवढाच आहे, हे पण टिकणार नाही. हा बुद्धीभेद टिकणार नाही. नरेटिव्ह तयार करण्यात ते यशस्वी झाले. काही प्रमाणात झाले यशस्वी झाले, नाही तर 44 टक्के मते आपल्याला मिळाली नसती. आपले फक्त एक टक्का मते कमी झाली आहेत, असंही ते म्हणाले.
त्यापेक्षा अधिक जागा एनडीएला
देशात मोदींना जनतेने समर्थन दिलं. तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं. त्याचवेळी आपलं ओरिसात सरकार आलं. अरुणाचलमध्ये सरकार आलं. आंध्रात एनडीएचं सरकार आलं. या सर्व गोष्टी काय सांगतात हे पाहिलं पाहिजे. काही लोकं विजयाचा नेरेटिव्ह सेट करतात. त्यांना तीन निवडणुका मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा अधिक जागा एनडीएला मिळाल्या, या एका वाक्याने मोदींनी सर्वांची बोलती बंद केली, असंही त्यांनी सांगितलं.