“देवेंद्र फडणवीस फार काळ ना विरोध पक्षनेते राहतील, ना माजी मुख्यमंत्री”
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की राज्यात सत्ता बदल होणार, या चर्चेला आता उधाण आलं आहे. (Bhayyaji Joshi on Devendra Fadnavis)
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी (Bhayyaji Joshi on Devendra Fadnavis) यांनी मोठं भाकीत केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात विरोधीपक्ष नेतेपद फार काळ राहणार नाही, शिवाय माजी मुख्यमंत्री हे पण त्यांना जास्त काळ बोलावं लागणार नाही, असं भय्याजी जोशी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की राज्यात सत्ता बदल होणार, या चर्चेला आता उधाण आलं आहे. (Bhayyaji Joshi on Devendra Fadnavis)
नागपुरातील साधना सहकारी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. भय्याजी जोशी म्हणाले, “इथे कोणीच आजन्म मुख्यमंत्री राहात नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनात विरोधीपक्ष नेतेपद हे फार काळ नाही, आणि माजी मुख्यमंत्री हे पण फार काळ नाही”
भय्याजी जोशी यांचं हे विधान नेमकं काय दर्शवत आहे, याबाबतचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार सहा महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणार नाही असा दावा केला जात आहे. त्यामुळे हे सरकार कोसळून भाजप पुन्हा सत्तेत येईल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचाही चर्चा आहेत. महाराष्ट्रातील भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर यांसारख्या नेत्यांच्या निधनाने केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्यासारखा क्लीन चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांना पसंती आहे. याशिवाय महाराष्ट्रात शिवसेनेसोबत फडणवीसांचे संबंध ताणल्यामुळे, त्यांना केंद्रात आणून राज्यातील भाजप-शिवसेना संबंध पुन्हा सुधारु शकतात अशी आशा भाजपला आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी केंद्रात संधी मिळू शकते.
महाविकास आघाडी सरकार
दरम्यान, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन कार्यभार हाती घेतला. मात्र तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा भाजपकडून केला जात आहे. पण हे सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे, त्यामुळे जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मनात आहे तोपर्यंत या सरकारला काहीही होणार नाही, हे सरकार 5 वर्षे नव्हे तर 15 वर्षे टिकेल असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे.