नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं शिवसेना-भाजप युतीची शक्यता मावळली? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आल्यामुळे युतीची शक्यता मावळली असल्याचंही बोललं यात आहे. या चर्चांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. त्यावेळी 43 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्रिपदं आली आहे. त्यात खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेची युती पाहायला मिळू शकते, अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आल्यामुळे युतीची शक्यता मावळली असल्याचंही बोललं यात आहे. या चर्चांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. (Devendra Fadnavis’s reaction regarding Shiv Sena-BJP alliance)
राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती पाहायला मिळू शकते अशा चर्चा सुरु असतानाच नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे युतीची शक्यता आता मावळली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना अशा चर्चा होत राहतात. अशा चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात. नारायण राणेंना त्यांचा क्षमतेचा विचार करुन केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार केला गेलेला नाही, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
‘कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज?’
प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसतान त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.
नाशिकला 50 वर्षानंतर प्रतिनिधीत्व
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील चार लोकांना संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असं सांगतानाच नाशिक जिल्ह्याला 50 वर्षानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालं, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
VIDEO: कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस भडकले
Devendra Fadnavis’s reaction regarding Shiv Sena-BJP alliance