जिल्हा परिषद अध्यक्षावर अविश्वास आणला तर राष्ट्रवादीला महागात पडेल, धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षावर अविश्वास ठराव आणला तर त्यांना महागात पडेल असा इशारा भाजपचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला आहे. | Dhairyasheel Mohite Patil Warns NCp Over Solapur ZP
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत (Solapur ZP) अध्यक्षपदाच्या अविश्वास ठरावावरून आता राजकारण हळूहळू पेटू लागलं आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षावर अविश्वास ठराव आणला तर त्यांना महागात पडेल असा इशारा भाजपचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी दिला आहे. (Dhairyasheel Mohite Patil Warns NCp Over Solapur ZP )
सदस्यांविरोधात राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसने जर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला तर आम्हीही त्यांच्या सभापतीविरोधात अविश्वास ठराव आणू, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांविरुद्ध जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असताना सुद्धा मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांनी भाजपा पुरस्कृत समविचारी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात तक्रार केली होती.
सध्या मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांच्या तक्राराचा विषय न्यायालयात गेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्याविरुद्धही विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटातील सहा सदस्यांचे भवितव्य हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत कायम सत्तेत असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा पुरस्कृत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचे प्रयत्न सुरु केल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत धैर्यशील मोहिते-पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षावर अविश्वास ठराव आणला तर राष्ट्रवादी काँग्रेसला महागात पडेल असा इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतली राजकीय समीकरणे आणि आकड्यांचा खेळ
महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची आघाडी होऊन महाविकास आघाडी स्थापन झाली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात तिघांना यश आले. हाच फॉर्म्युला सोलापूर जिल्हा परिषदमध्ये अवलंबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला खरा मात्र सोलापूर जिल्हा परिषदमध्ये बहुमत असतानासुद्धा महाविकास आघाडीचे मनसुबे उधळले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा धक्कासुद्धा बसला. मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा परिषद असं गेल्या कित्येक वर्षापासून राजकीय समीकरण आहे. त्याचाच प्रत्यय जिल्हापरिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील गटाने दाखवून दिला होता.
31 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने भाजप आणि समविचारी आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आले, याची गंभीर दखल घेत आणि पक्षविरोधी मतदान केल्याचा आरोप ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने त्या सहा सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
इतकंच नाही तर पक्षाने या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी झालेल्या मोहिते पाटील गटाच्या त्या सहा सदस्यांचा सदस्यत्व रद्द करण याबाबतची सुनावणी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली असून हा न्याय आता न्यायालयात गेला आहे. शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर हे सदस्य निवडून येतात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात मतदान करतात ही बाब गंभीर असल्यामुळे पक्ष स्थितीचा भाग असून आम्ही कारवाई केल्याचं सांगत मोहिते पाटील गटाच्या सहा सद्यस्यांचा वाद न्यायालयात गेला आहे.
कोणत्या पक्षाचे किती सदस्य…?
सोलापूर जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 66 सदस्यांपैकी भाजपच्या अनिरुद्ध चव्हाण यांना 37 तर राष्ट्रवादीचे त्रिभुवन धाईंजे यांना 29 मते मिळाली होती तर उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपचे दिलीप चव्हाण यांना 35 तर राष्ट्रवादीचे विक्रांत पाटील यांना 31 मते मिळाली होती. मात्र विजयसिंह मोहिते पाटील गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी जोरदार झटका दिला होता.
राष्ट्रवादीची सदस्य संख्या सोलापूर जिल्हा परिषदेतील 23 आहे. त्यातील 06 मोहिते गटाचे आहेत तर शिवसेनेचे 5 पैकी 4 करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील गटाचे आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे हा करिष्मा झाला होता. तेव्हापासून मोहिते पाटील गटाचे सहा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय संघर्ष सुरु आहे.
मोहिते पाटील गटाचा ‘बारामतीकरांना’ धक्का?
जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत मोहिते पाटील गटाने दिलेला हा धक्का राष्ट्रवादीला पर्यायानं बारामतीकरांना दिलेला धक्का मानला जात होता. त्यामुळे पक्षाने याची गंभीर दखल घेत अशा सदस्यांची हकालपट्टी केली आहे. त्यात आता सदस्यत्व रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटाकडून सुद्धा तितकीच मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.
(Dhairyasheel Mohite Patil Warns NCp Over Solapur ZP )
हे ही वाचा :
डोंबिवलीतील खिंडार राज ठाकरेंनी 24 तासात बुजवले, खंद्या शिलेदाराची नियुक्ती
या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा