पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचे फोटो एकाच बॅनरवर, चर्चा तर होणारच!
पहिल्यांदाच गावातील निवडणुकीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे फोटो एकत्रित छापण्यात आलेत.
बीड-परळी– पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपात नाराज असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने तर त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रणही दिले. पंकजा मुंडे यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. पण आज एका बॅनरमुळे नव्याच राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे भाऊ बहीण असले तरी कट्टर राजकीय विरोधक आहेत. पण या दोघांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत.
राजकारणात कितीही शत्रूत्व असलं तरी कौटुंबिक विषय येतो तेव्हा हे दोघेही भाऊ-बहीण नेहमीच समजुतीने वागताना दिसले आहेत. सध्या चर्चेत असलेलं बॅनरदेखील याच समजदारीचा भाग आहे.
तर हे बॅनर आहे परळीतल्या नाथरा ग्रामपंचायत निवडणुकीचं. नाथरा हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मूळ गाव. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक एकत्रित आले आहेत.
पहिल्यांदाच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे फोटो एकत्रित छापण्यात आलेत. या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पंकजा आणि धनंजय यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता एक सरपंच आणि एका सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. या दोघा बहीण भावाचे फोटो एकाच फ्लेक्स वर छापण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.