Dhananjay and Pankaja Munde : भावाची बहिणीला टपली! पंकजाताई आणि धनुभाऊच्या चेहऱ्यावरील हास्य काय सांगतं?
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कधी टीका टिप्पणी, तर कधी बहिण-भावाचं प्रेम दिसून आलं. डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबईतील रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन आज पार पडलं. या कार्यक्रमात धनुभाऊंनी पंकजाताईंना डोक्यावर टपली मारल्याचं पाहायला मिळालं!
मुंबई : राज्याच्या राजकारणात काका पुतणे आणि भावा-बहिणीच्या जोड्या चांगल्याच चर्चेत असतात. त्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची चर्चा तरी अधिकच. कधीकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाढलेले हे दोन्ही बहिण भाऊ नंतर वेगळे झाले. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडेंचा साथ सोडत पवारांचं नेतृत्व स्वीकारलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून बीड जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कधी टीका टिप्पणी, तर कधी बहिण-भावाचं प्रेम दिसून आलं. डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांच्या मुंबईतील रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन आज पार पडलं. या कार्यक्रमात धनुभाऊंनी पंकजाताईंना डोक्यावर टपली मारल्याचं पाहायला मिळालं!
पंकजाताई आणि धनुभाऊंचं बहिण-भावाचं प्रेम
पंकजा मुंडे यांनी भाषणादरम्यान मुंडे-महाजन लेन्समधून बघून आता पवारांच्या जवळ जाऊन बसणारे धनंजय मुंडे कुणाला जमणार नाही असं काम त्यांनी केलं, अशी मिश्किल टिप्पणी केली. आपलं भाषण झाल्यानंतर पंकजा मुंडे आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. त्यांच्यानंतर भाषणासाठी उठून जात असताना धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्या डोक्यावर हलकेच टपली मारली. पंकजा मुंडे यांनी ती चुकवण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा पंकजाताई आणि धनुभाऊसह तिथे उपस्थित असलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि व्यासपीठावरील सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. राजकारणात वेगळ्या पक्षात असूनही, वेळप्रसंगी एकमेकांवर टीका केल्यानंतरही या बहिण-भावातील प्रेम राजकीय वर्तुळात प्रवेश करु इच्छिणाऱ्या अनेक युवक-युवतींसाठी दिशादर्शक आहे, असंच हा व्हिडीओ पाहून म्हणावं लागेल.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबईतील रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटनासाठी राज्यातील बडे नेते उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, अमित देशमुख, धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.