ताई तुम्ही 10 वर्षापूर्वी भरल्या ताटावरुन उठवलं, आता मी राक्षस कसा, धनंजय मुंडेंच्या डोळ्यात अश्रू
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत प्रचारसभा आयोजित केली (Dhananjay munde Parli) होती. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर करताना धनंजय मुंडे भावूक झाले.
बीड : विधानसभा निवडणूक प्रचारांचा झंझावात आज संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत प्रचारसभा आयोजित केली (Dhananjay munde Parli) होती. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर करताना धनंजय मुंडे भावूक झाले. “भर सभेत माझी बहीण मला म्हणते, मी दृष्ट राक्षस आणि या राक्षसाचा मी नायनाट करणार. पण ताई मी असे काय केले की तुम्हाला मी राक्षस वाटतो.” असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांची काल परळीत पंकजा मुंडे यांच्यासाठी सभा पार पडली. या सभेत पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडें यांना दृष्ट राक्षस म्हणत टीका केली होती. या टीकेवर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर केले.
उदयनराजेंच्या सभेत माझी बहीण मला म्हणते, “मी दृष्ट राक्षस आणि या राक्षसाचा नायनाट करणार. ताई मी असे काय केले की तुम्हाला मी राक्षस वाटतो” असा प्रश्न धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना (Dhananjay munde Parli) विचारला.
“ताई 10 वर्षापूर्वी भरल्या ताटावरुन तुम्ही या भावाला उठवलं. हा भाऊ मोठ्या मनाने बाजूला झाला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. त्यावेळी अनेक लोक काम करायला तयार नव्हते. तेव्हा मी आणि अण्णांनी जनतेच्या पायावर डोकं ठेवलं आणि तुम्हाला निवडून आणलं. हे सर्व केलं म्हणून मी राक्षस.” असेही धनंजय मुंडे म्हणाले.
“माझं या मातीशी नातं आहे. मला या मातीतील माणसाला मोठं करायचे आहे. हे सर्व मी करतो म्हणून मी दृष्ट राक्षस. ताईसाहेब, आपण ज्यांचा वारसा चालवता आहे ना. त्यांना ही भाषा शोभत नाही.” असा सल्लाही देत धनंजय मुंडे भावूक झाले.
पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उदयनराजे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्या. यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. “ताईंनी मोदींना आणलं, शाहाला आणलं, उदयनराजेंना आणलं, का तर फक्त मला संपवण्यासाठी. माझ्या बहिणीला फक्त मला संपवायचे आहे,” असेही ते म्हणाले.
“बीडमध्ये मी मंदीर बांधण्यापासून सामुहिक विवाहसोहळ्यापर्यंत सर्व काही केले आहे. मी हे केलं म्हणून मला संपवायचे आहे. माझ्यासारख्या भावासाठी इतका वाईट दिवस नाही.” असेही धनंजय मुंडे म्हणाले.