स्पेशल रिपोर्ट : धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाकडून खरंच दिलासा मिळालाय का?
ज्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तो उच्च न्यायालयाचा आदेशालाच सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचं काय होणार असाही प्रश्न आहे.
बीड : इनामी जमीन लाटल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. 420 या कलमसह तब्बल पाच कलमं धनंजय मुंडे यांच्यावर दाखल करण्यात आलेत. पण ज्या उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तो उच्च न्यायालयाचा आदेशालाच सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचं काय होणार असाही प्रश्न आहे. तर धनंजय मुंडेंवरील गुन्हा कायम असल्याने त्यांनी दिशाभूल करु नये, असं तक्रारदार राजाभाऊ फड यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांनी आपल्या जगमित्र सहकारी साखर कारखण्यासाठी बेलखंडी मठाला शासनाने इनाम दिलेली जमीन बेकायदेशीर खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता धनंजय मुंडेंवर काय कारवाई होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असतानाच सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालायच्या आदेशाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे धनंजय मुडेंना दिलासा मिळाला असल्याचं सांगितलं जातंय, पण सुप्रीम कोर्टाने गुन्हा रद्द करण्याबाबत काहीही म्हटलेलं नाही.
धनंजय मुंडे यांचे वकील या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असल्याचं सांगत असले तरी सरकारी वकिलांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात एफआयआर बाबत काहीही मत व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना खरंच दिलासा मिळालाय का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे ज्या प्रकरणावरुन अडचणीत सापडले आहेत ते मूळ प्रकरणही सध्या चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2012 साली पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता. याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कोणकोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल?
- कलम 420
- कलम 464
- कलाम 465
- कलम 468
- कलम 471
या 14 जणांवर गुन्हा
- चंद्रकांत रणजित गिरी
- ज्ञानोबा सीताराम कोळी
- गोविंद सीताराम कोळी
- बाबू सीताराम कोळी
- उद्धव कचरू सावंत
- माणिक तुकाराम भालेराव
- विठ्ठल गणपत देशमुख
- धोंडीराम अण्णा चव्हाण
- डिगंबर वसंत पवार
- धनंजय पंडितराव मुंडे
- राजश्री धनंजय मुंडे
- प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे
- वाल्मिकी बाबुराव कराड
- सूर्यभान हनुमंतराव मुंडे
या 14 जणांवर हा गुन्हा दाखल झालाय आणि विशेष म्हणजे यात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्यावरही हा गुन्हा दाखल झालाय. वरील चौदाही जणांवर दाखल करण्यात आलेले सगळेच गुन्हे हे फसवणुकीच्या कलमांचे आहेत. विशेष म्हणजे हे सगळे कलम अजामीनपात्र आहेत आणि गुन्ह्यासाठी त्याच्या स्वरूपावरून सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
“धनंजय मुंडेंनी दिशाभूल करु नये”
दाखल गुन्ह्यात सुप्रीम कोर्टाने स्टे दिलाय. त्यामुळे एफआयआर हा निव्वळ आता एक कागद आहे, असं धनंजय मुंडे यांच्या बाजूने सांगण्यात येत आहे. पण तक्रारदार राजाभाऊ फड यांनी मात्र हा गुन्हा कायम असून धनंजय मुंडे यांनी दिशाभूल करू नये, अशी प्रतिक्रिया दिली. तक्रारकर्त्यांनी दाद न देणाऱ्या बर्दापूर पोलिसांविरुद्ध पोलीस अधीक्षक आणि जिल्हा न्यायालयात दाद न मागता ऊच्च न्यायालयाकडे दाद मागणं अनुचित आहे. एवढ्या तांत्रिक कारणांनी ऊच्च न्यायालयाच्या आदेशांवर आजची स्थगिती दिलेली असली तरी पोलिसांनी गुन्हा सकाळीच दाखल केल्याने धनंजय मुंडेंना पोलीस कारवाईपासून दिलासा नाही, असंही राजाभाऊ फड यांनी सांगितलंय. सुप्रीम कोर्टाने गुन्हा रद्द केल्याची चुकीची माहिती धनंजय मुंडे माध्यमांना देत असून याविरुद्ध तातडीने अवमानना याचिका दाखल करणार असल्याचं फड यांनी सांगितलं.
बीडचं राजकारण हे महाराष्ट्रात सर्वात संवेदनशील राजकारण समजलं जातं या जिल्ह्यात नात्या-गोत्यांच्या राजकारणातून अनेकांचे पत्ते कट करण्याचा प्रयत्न केला जातो. धनंजय मुंडे यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय त्यालाही अशीच राजकीय आणि नात्यागोत्यांची पार्श्वभूमी आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात ज्यांनी तक्रार दिली ते राजाभाऊ फड हे सुद्धा असेच नात्यागोत्याच्या राजकारणातून आलेले आहेत.
राजाभाऊ फड कोण आहेत?
राजाभाऊ फड हे साखर कारखान्याच्या घोटाळ्यामुळे राज्यभर गाजलेल्या रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मतदारसंघातून विधानसभेचे उमेदवार असतात. याच विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचे दाजी मधुसूदन केंद्रे आमदार आहेत. दाजीला अडचणीचं ठरत असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी रत्नाकर गुट्टे यांचा कारखान्याचा घोटाळा बाहेर काढल्याचा आरोप आहे. आता सासरे रत्नाकर गुट्टे अडचणीत असल्यामुळे त्यांचे जावई राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडे यांच्या कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले असं बोललं जातं.
धनंजय मुंडे यांच्यावरील आतापर्यंतचे गुन्हे
धनंजय मुंडे यांच्यावर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पण त्यांच्यावर दाखल झालेला हा काही पहिला गुन्हा नाही. धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
- धारूर पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडीवरून झालेल्या दंगलीचा गुन्हाही मुंडे यांच्यावर दाखल दाखल होता.
- जगमित्र सूतगिरणीच्या नावे घेतलेले जिल्हा बँकेचे कर्ज वेळेत न फेडल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होता.
- कारखान्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे दिलेला धनादेश बाऊन्स झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला.
- 1988 मध्ये मयत व्यक्तीची जमीन 2010 साली खोटा अंगठा लावून खरेदी केल्याचाही गुन्हा दाखल आहे.
- साखर आयुक्तालयाला दिलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याचाही आरोप मुंडे यांच्यावर आहे.
- महसूल यंत्रणेत खोट्या नोंदी करुन कृषी जमिनीचे कृषीकरण करणे असेही आरोप त्यांच्यावर आहेत.
धनंजय मुंडे यांच्याकडूनही बहिणीवर घोटाळ्याचे आरोप
बीडमध्ये प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष दिसतो. धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी बहिणीवर अनेकदा घोटाळ्याचा आरोप केला आहे.
- पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा लावून धरला होता. पण या प्रकरणी पंकजा मुंडेंना क्लीनचिट देण्यात आली.
- अंगणवाडी सेविकांसाठी देणार असलेल्या मोबाईलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केला होता. यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरणही दिलं होतं.
- पंकजा मुंडे यांच्या रेडिको कंपनीच्या दूषित पाण्याचं प्रकरण धनंजय मुंडे यांनी उचलून धरलं होतं.
- पंकजा मुंडे यांच्या बिअर कंपनीला दिले जाणाऱ्या पाण्याचा मुद्दाही धनंजय मुंडे यांनी उचलला होता.
- रत्नाकर गुट्टे यांनी साखर कारखान्यात केलेल्या कर्जाचा घोटाळाही धनंजय मुंडे यांनी समोर आणला होता.
धनंजय मुंडे यांनी जसे इतरांवर आरोप केले, तसेच ते स्वतः देखाली अडकल्याचं यातून दिसतंय. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर धनंजय मुंडे मात्र अडचणीत सापडल्याचं स्पष्ट होतंय. सुप्रीम कोर्टाकडून मिळालेला हा दिलासा आहे की राजाभाऊ फड यांच्या आरोपाप्रमाणे दिशाभूल आहे हे पुढील सुनावणीवेळीच स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्ट धनंजय मुंडेंच्या याचिकेवर पुढील निर्णय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर देणार आहे.