धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; अजित पवारांची माहिती
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आता हे वृत्त चुकीचे आहे, डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून, मुंडे यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याचे यावेळी अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी मुंडेंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
‘भोवळ आल्याने शुद्ध हरपली ‘
मंगळवारी धनंजय मुंडे जनता दरबाराला उपस्थित होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी देखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
‘सर्व मिळून आंबेडकर जयंती साजरी करू’
दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केली आहे. या भेटीदरम्यान याबद्दल चर्चा झाली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही सर्व मिळून यशस्वी साजरी करून, तुम्ही चिंता करू नका असे पवार यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या
Pune NCP agitation : खोटं बोलणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करा, पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक
चौकशीसाठी हजर व्हा, अन्यथा फरार घोषित करू, सोमय्यांना आर्थिक गुन्हेशाखेची नोटीस